ठिकठिकाणच्या कृष्णमंदिरांमध्ये कृष्णजन्मोत्सव साजरा केल्यानंतर आज दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्यात दहीहंडीचा उत्सव साजरा झाला.
यावर्षीच्या गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या उत्सवावर महापूर आणि तिवरे येथील दुर्घटनेचे सावट पडले आहे. गोकुळाष्टमी पार पडल्यानंतर आज सर्वत्र दहीहंडीचा उत्सव पार पडला कोकणासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील पूर परिस्थितीमुळे अनेक दहीहंड्या यावर्षी रद्द झाल्या. दहीहंडीसाठी होणारा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी करण्याचा निर्णय अनेक मंडळांनी जाहीर केला आहे. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक दहीहंड्यांचे कार्यक्रम यावर्षी कमी झाले आहेत.
रत्नागिरीतील मांडवी किनाऱ्यावरील आमदार उदय सामंत पुरस्कृत दहीहंडी आणि साळवी स्टॉप येथील जिल्हा मोटार मालक असोसिएशन पुरस्कृत दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवरूखमध्ये संगमेश्वर तालुका मनसे आणि देवरूख शहर व्यापारी संघटनेनेही या वर्षीचा दहीहंडीचा उत्सव रद्द केला. चिपळूण तालुक्याात गेल्या दोन जुलै रोजी येथील धरण फुटल्याने २४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे चिपळूण तालुका शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि राणे पुरस्कृत राजकीय पक्षांसह विविध मंडळांनी दहीहंडीचा उत्सव रद्द केला. भारतीय जनता युवा मोर्चाने मात्र दहीहंडी साजरी केली.
जिल्ह्यात ३५१ सार्वजनिक आणि तीन हजार २३९ खासगी अशा एकूण तीन हजार ५९० दहीहंड्या फोडण्याचा कार्यक्रम आज झाला. सर्वाधिक ९४ सार्वजनिक दहीहंड्या रत्नागिरी पोलीस ठाण्याच्या कक्षेत फोडल्या गेल्या, तर सर्वांत कमी एक सार्वजनिक दहीहंडी नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत फोडण्यात आली. सर्वाधिक पाचशे खाजगी दहीहंड्या खेड तालुक्यात फोडण्यात आल्या. कोठेही अनुचित प्रकार झाल्याचे किंवा दहीहंडीच्या मनोऱ्यावरून पडल्याने गोविंदा जखमी झाल्याचे वृत्त सायंकाळपर्यंत नोंदविले गेले नव्हते. दुपारपासूनच ढोलताशांच्या गजरात दहीहंड्या फोडल्या गेल्या. पावसाने पाठ फिरविल्याने मात्र गोविंदाचा काहीसा विरस झाला.
