कागदी लगद्यापासून बनवण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचे नवे संशोधन झाले आहे. राष्ट्रीय हरित लवादाने त्याविषयी परिपत्रक काढले आहे. त्यामुळे शासनाने शाडूमातीच्या नैसर्गिक रंगात केलेल्या मूर्तींनाच प्राधान्य द्यावे, अशी मागणी रत्नागिरीतील हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कागदी लगद्यात अनेक विषारी रसायने असून ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. यामुळे कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींमुळे प्रदूषण होत आहे. यामुळे शाडूच्या मूर्तींना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे या संघटनांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली आहे. हे निवेदन आज सादर करण्यात आले.
या शिष्टमंडळात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष राकेश नलावडे, देवेंद्र झापडेकर, सुशील कदम, ऋषिकेश पाष्टे, हिंदू राष्ट्र सेनेचे रूपेश तावडे, रत्नागिरी ग्राहक पंचायतीचे संस्थापक सदस्य जयंत आठल्ये, श्रीराम नाखरेकर, अरविंद बारस्कर, प्रफुल्ला पोंक्षे, संकेत पोंक्षे, चंद्रशेखर गुडेकर, नीलेश नेने, पुरुषोत्तम वागळे, संजय जोशी यांचा समावेश होता.
