भारताचा बॅडमिंटनपटू साईप्रणीतला आज(24 ऑगस्ट) बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यफेरीत अव्वल मानांकीत जपानच्या केंटो मोमोटाकडून पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
यावर्षीच्या अर्जून पुरस्कारासाठी निवड झालेल्या भारताच्या साईप्रणीतला मोमोटाने 21-13, 21-8 अशा फरकाने पराभूत केले. या लढतीत पराभव स्विकारावा लागला असला तरी साईप्रणीतने भारताला बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीमध्ये 36 वर्षांनंतर पदक मिळवून देण्याचा पराक्रम केला आहे.
याआधी बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला 1983 मध्ये पुरुष एकेरीत प्रकाश पदुकोण यांनी पहिल्यांदा पदक मिळवून दिले होते.
