कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन अधिक तीव्र होणार

0

कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीतच्या वतीने कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जाहीर सभा रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०१९ रोजी रत्नागिरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हॉल, सिव्हील हॉस्पीटल रत्नागिरी येथे सकाळी ११.३० वाजता संपन्न झाली. या सभेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील सुमारे दीडशे प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रकल्पग्रस्त रेल्वे उशीराने धावत असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली.

या सभेला कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे कार्याध्यक्ष श्री. विनायक भगवान मुकादम, सचीव श्री. अमोल कृ. सावंत व सहसचीव श्री. प्रभाकर सहदेव हातणकर यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून चालत असलेल्या लढ्याबाबतची माहिती सांगितली.

दिनांक १ जुलै पासून ५ जुलै पर्यंत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या कागदपत्रांच्या छाननीदरम्यान स्वीकृत केलेले अर्ज निवेदने ह्यावर आज दोन महिने लोटत आले तरी त्यांची माहिती उपलब्ध होत नाही ही संशयास्पद बाब असून कोकण रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यानी सर्व कागदपत्रे आम्हा प्रकल्पग्रस्तांना न्याय्य हक्क असताना नोकरीत न घेतल्याने जाणीवपूर्वक गहाळ केलेली असावीत अशी शंकाही अनेक प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे.

कोकण रेल्वे महामंडळ वेळोवेळी कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची फसवणुक करीत असून, ग्रुप डी च्या नियुक्तीमध्येसुध्दा अनेक उमेदवारांची फसवणुक केलेली आहे. तसेच सदरहू परीक्षा ह्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील उमेदवारांना प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणेसाठी कारवार येथे निर्जन स्थळी घेण्यात आल्या होत्या त्यामुळे शारिरिक चाचणीपासून अनेक उमेदवारांना मुकावे लागले आहे. ह्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे नेहमीप्रमाणेच कोकण रेल्वे प्रशासनाने फसवणुक केलेली असून ह्याबाबत मानवाधिकार संस्थेकडे सर्वच प्रकल्पग्रस्त आपली तक्रार दाखल करणार आहेत असे या सभेत स्पष्ट करण्यात आले.
कोकण रेल्वे अधिकाऱ्यानी गेल्या अनेक वर्षांपासून वेलफेअरच्या नावाखाली भ्रष्टाचार केला हे उघडकीस आल्यामुळे आता सन २००० पासून कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार कसा केला आहे ह्याबाबत पुराव्यानिशी आपणा सर्वच प्रसारमाध्यमांकडे पोहोचणार आहोत असे एकमताने ठरविण्यात आले. कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बैठका, पत्रव्यवहार करून अधिसूचनेनुसार एका गट नंबरवर एका उमेदवारास नोकरी देण्याचा नियम असताना कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारी मार्गाने पैसा गोळा करून एका गट नंबरवर जवळजवळ १० ते १२ उमेदवांरांना नोकऱ्या दिल्या आहेत मात्र अनेक उमेदवारांना ते पात्र असूनही एका गट नंबरवर उमेदवारांना घेतल्याने अनेकांना डावल्याचे षडयंत्रही कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे. ह्याचा जाब विचारला असता त्याचप्रमाणे ह्याबाबतची कागदपत्रांची पडताळणी केली असता अनेकांची कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशी पुष्टी जोडून हेच अधिकारी आपले हात झटकत आहेत. मात्र आता ह्याचा जाब बेलापूर कार्यालयावर धडकून सर्व अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्त आंदोलनाच्या स्वरूपात लवकरात लवकर विचारणार असल्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला आहे.

अशा सबळ पुराव्यानिशी कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त जशी वेलफेअरच्या नावाखाली भ्रष्टाचार केल्याने अनेक अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी चालू आहे तशी चौकशी करण्यासाठी सरसावणार आहेत.

अनेक उमेदवारांनी आपल्या व्यथा मांडताना काही उमेदवारांनी तर मेडिकल सारख्या शेवटच्या स्टेपपर्यंत पर्यंत पोहोचलेले असतानाही त्यांना नोकरीपासून वंचित ठेवले गेले असे अनेक उमेदवार आहेत ह्याचाच अर्थ असा होते की अशा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांनी वसई, विरार सारख्या मोक्याच्या ठिकाणी रिसॉट, मोठे फ्लॅट्स खरेदी केलेले आहेत आणि म्हणूनच याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून नियुक्ती प्रक्रियेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त सीबीआयकडे अर्ज करणार आहेत.

भविष्यामध्ये होणारी कोकण रेल्वेमध्ये होणारी नोकर भरती ही फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच होण्यासाठी तसेच ग्रुप डी सारख्या परीक्षांसाठी ऑनलाइन परीक्षा रद्द करून फक्त शारिरिक चाचणी क्षमतेवरच भरती प्रक्रिया करण्यावर भर देण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त सरसावणार आहेत.

तरी कोकण रेल्वे प्रशासनाला जाग येण्यासाठी आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील सर्व कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त आंदोलन अधित तीव्र करणार असून, ह्यामध्ये बहुसंख्य प्रकल्पग्रस्त सहभागी होतील असा विश्वास सर्वच प्रकल्पग्रस्तांनी केला असून, कोकण रेल्वे प्रशासनाला यामुळे निश्चित जाग येऊन आमचा लढा यशस्वी होईल आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल असा ठाम विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.

यापुढील रणनिती लवकरात लवकर निश्चित करण्यात येईल असे कृती समितीचे कार्याध्यक्ष श्री. विनायक भगवान मुकादम यांनी समारोपादरम्यान सर्व प्रकल्पग्रस्तांना कळविले आहे.

या सभेला कृती समितीचे कार्याध्यक्ष श्री. विनायक मुकादम, सचीव श्री. अमोल सावंत, सहसचीव श्री. प्रभाकर हातणकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच सदरहू सभेला खजिनदार कु. प्रतिक्षा सावंत, खेड तालुकाध्यक्ष सनी मयेकर, पोमेंडी रत्नागिरीचे श्री. दत्ताराम शिंदे, मुकादम मॅडम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here