रत्नागिरी : अल्पवयीन मतीमंद मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी विनोद सदाशिव वाकोडे, उ.व.सु. ३४ वर्षे याच आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पिडीत मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याचीही चर्चा व मोठ्या प्रमाणात आंदोलने त्यावेळी जयगड परीसरामध्ये होत होती. जयगड, खंडाळा पोलीस स्टेशनहद्दीतील मतीमंद असलेली व अल्पवयीन असलेल्या मुलीवर आरोपी विनोद सदाशिव वाकोडे, उ.व.सु. ३४ वर्षे, याने सप्टेंबर २०१८ मधील गणपती सणापासून पंधरा पंधरा दिवसांच्या अंतराने ४ ते ५ वेळा फिर्यादी हिचे घराजवळ व्हॉलीबॉल ग्राउंड जवळच्या कातळावर जबरी संभोग केल्याची तसेच पिडीत अल्पवयीन मुलगी अत्याचारामुळे गरोदर असल्याची कल्पना मुलीचे कुटुंबाला मिळाल्यावर तात्काळ फिर्याद जयगड पोलीस ठाणे येथे नोंदवण्यात आली होती. पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विनोद सदाशिव वाकोडे यांचे नावे फिर्याद दाखल झाल्याने त्याचेवर गुन्हा नोंदवून त्यावरील दि.१३ डिसेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली होती.
आरोपी याचे विरोधात फिर्यादी यांचे तक्रारी नुसार जयगड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३६/२०१८ नुसार भा.द.वि.सं.कलम ३७६(२), (जे) (एल) (एन), ३६६ (अ), लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,५ (जे) २ (एल), ६, ७, ८, ९ (आय) (के) (एल), १० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी याचे विरोधात जयगड पोलीसांमार्फत केसचे सखोल तपासकाम पूर्ण करण्यात येवून दि.०७/०३/२०१९ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. तसेच आरोपी याचा जामिन अर्ज फेटाळण्यात आला होता व केसचे कामकाज सरकार पक्षातर्फे वेगाने चालविण्यात आले. सरकार पक्षातर्फे केसचे सुनावणी कामी एकूण सात साक्षीदारांची न्यायालयात साक्ष नोंदवण्यात आली होती. आरोपीचे वतीने वकील अॅड.मनिष चंद्रकांत नलावडे यांनी सर्व साक्षीदारांचा उलटतपास घेतला. तसेच उलटतपासामध्ये पिडीत मुलीने आरोपी याचे नाव तिला शिकवल्यामुळे व दबावाखाली सांगितल्याचे तसेच आरोपी याने गुन्हा न केल्याचा तसेच पिडीत मुलीचे वय पुराव्यानुसार शाबित न झाल्याचा जोरदार बचाव आरोपी तर्फे घेण्यात आला. सदर खटल्याची अंतिम सुनावणी ५ महिने कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येऊन दि.१७ ऑगस्टला उभयपक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला होता. सोमवार दि.२६ ऑगस्ट रोजी आरोपी याचे वकीलांनी केलेला बचाव व युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी यांची पुराव्यामध्ये विसंगती व संशयाचा फायदा मिळाल्याने रत्नागिरीचे मे, जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी आरोपी याची निर्दोष मुक्तता केली. याकामी आरोपीतर्फे अॅड. मनिष नलावडे, अॅड. अपराजिता नाईक यांनी केसचे संपूर्ण कामकाज पाहिले.
