सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील बीएसएनएल टॉवरचा वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्याविषयी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचना दिल्या असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील बीएसएनएलचे टॉवर सुरू होऊन ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील पूर परिस्थिती व आठवडाभरावर आलेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले. जिल्ह्यातील बीएसएनएलच्या टॉवरचे वीज देयक थकल्यामुळे वीज कंपनीने त्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्राहकांचे फोन बंद पडले आहेत. याविषयी नागरिकांनी खा. विनायक राऊत यांच्याशी संपर्क साधला होता. त्या अनुषंगाने खा. राऊत यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना याविषयी तातडीने नागरिकांना दिलासा देण्याविषयी सुचवले होते. जिल्ह्यात बीएसएनएलच्या ग्राहकांची असणारी मोठी संख्या आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. केसरकर यांनी ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांच्याशी तातडीने चर्चा केली. या चर्चेस सकारात्मक प्रतिसाद देत ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे यांनी बीएसएनएल टॉवरचा वीज पुरवठा तात्काळ सूरू करण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीला दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिली. या विषयी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खा.विनायक राऊत यांचे आभार मानले आहेत.
