कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली रतांबी वहाळ येथे रविवारी दुपारी 4.30 च्या सुमारास दोन मोटारसायकलींमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात वैभववाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक प्रवीण विनायक खाडये (वय 32, रा. नाधवडे, गावठणवाडी) व दयानंद सावळाराम सुतार-पांचाळ (27, रा. उंबर्डे -सुतारवाडी) हे दोघे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. प्रवीण खाडये यांच्या सोबत असलेले त्यांचे सासरे शिवराम बापू शेटये (67, रा. नाधवडे) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही मोटारसायकलींमध्ये झालेली धडक इतकी भयानक होती की, दयानंद सुतार हा महामार्गापासून 15 ते 20 फूट अंतरावर दरीत फेकला गेला, तर प्रवीण खाडये यांच्या हेल्मेटचा चक्काचूर होऊन डोके रस्त्यावर आपटून ते जागीच गतप्राण झाले होते. अपघातानंतर दोन्ही मोटारसायकली महामार्गावरच पडल्या होत्या. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर हुंबरठचे माजी सरपंच दिलीप मर्ये, बाळा परब, रवींद्र गोसावी यांनी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या शिवराम शेटये यांना खासगी वाहनातून उपचारासाठी कणकवलीतील रुग्णालयात पाठविले. त्यानंतर वाहतुकीची कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला गेला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे, प्रकाश कदम, अनमोल रावराणे, जिल्हा वाहतूक शाखेचे पांडुरंग पांढरे, सुनील निकम, महामार्ग वाहतूक शाखेचे श्री.देसाई, श्री.बुचडे आदी अपघातस्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांकडून दोन्ही मृतदेह 108 व सिरील फर्नांडिस यांच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर वाहतूक कोंडी सोडविण्यात आली.
अपघातात ठार झालेल्यांमधील प्राथमिक शिक्षक प्रवीण खाडये हे आपल्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून सासरे शिवराम शेटये यांना सोबत घेवून कणकवली येथे राहत असलेलेे त्यांचे मेहुणे श्रीकांत शेटये यांना भेटण्यासाठी येत होते. तर दयानंद सुतार हा कणकवली येथून उंबर्डे येथे जात होता. दयानंद याचा उंबर्डे येथील मित्र किशोर दळवी याची मुलगी उपचारासाठी कणकवलीतील खाजगी रूग्णालयात दाखल आहे. तिच्यासाठी जेवणाचा डबा देण्यासाठी किशोर दळवी यांची युनिकॉन मोटरसायकल घेवून तो दुपारी 1.30 वा. उंबर्डे येथून कणकवली येथे आला होता. सायंकाळी तो उंबर्डे येथील घरी तो परत जाण्यासाठी कणकवली येथून निघाला होता. जानवली येथे दोन्ही मोटरसायकलींमध्ये समोरासमोर धडक झाली. काही स्थानिक ग्रामस्थांच्या मते दयानंद सुतार हा पुढे जात असलेल्या वाहनाला ओव्हरटेक मारण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी समोर येणार्या प्रवीण खाडये यांच्या मोटरसायकलला धडक झाल्याने तो फेकला गेला तर प्रवीण खाडये हे महामार्गावर रस्त्याच्या थारोळयात पडले होते. अपघातातील दोन्ही मृत हे वैभववाडी तालुक्यातील असल्याने जि.प.सदस्य सुधीर नकाशे, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी सभापती बंडया मांजरेकर, भाजपा तालुका सरचिटणीस बाबा कोकाटे, डॉ.विजय शेटये यांच्यासह उंबर्डे येथून किशोर दळवी, अमित पांचाळ, सुरेश रहाटे, विजय दळवी आदींसह अनेकांनी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली. तर प्रवीण खाडये हे सध्या मांगवली प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर दत्ता सावंत, गिल्बर्ट फर्नांडिस, लक्ष्मण वळवी व प्राथमिक शिक्षक तसेच भाजपा तालुकाप्रमुख संदेश पटेल, शिशिर परुळेकर, कन्हैया पारकर, दामू सावंत आदी तातडीने उपजिल्हा रूग्णालयात पोहोचले. दयानंद सुतार याच्या घरची परिस्थिती गरिबीची असून तो वर्षभरापूर्वी 108 रूग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत होता. तर गेले काही दिवस तो वैभववाडीतील एका इलेक्ट्रिकल दुकानात काम करायचा. अविवाहित असलेल्या दयानंद याच्या पश्चात आई व परिवार आहे. मांगवली प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रवीण खाडये यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. महामार्गावर याच भागात दोन वर्षांपूर्वी तलाठी व प्रसिद्ध कवी उत्तम पवार यांचा मोटारसायकल अपघातात जागीच मृत्यू झाला होता. महामार्गाचा अरूंद भाग आणि वळण रस्ता त्यातच असलेले खड्डे हे अपघाताचे कारण ठरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
