कासार्डे : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालयातील 12 पदे मंजूर असताना फक्त दोनच अधिकारी कार्यरत आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे दोन जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. बाकी सर्व पदे रिक्त असल्याने क्रीडा शिक्षक व खेळाडूंना अनेक अडचणीना सामना करावा लागत आहे. याबाबत क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने सचिव दिनेश म्हाडगुत यांनी संवाद सभेत शिक्षणमंत्री अशिष शेलार यांचे लक्ष वेधले. सिंधुदुर्गनगरी जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही संवाद सभा झाली. शालेय शिक्षणमंत्री अॅड. अशिष शेलार, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे,माजी आमदार अजित गोगटे, अतूल काळसेकर,संदेश पारकर, अतूल रावराणे, जयदेव कदम,राजू कदम, बंड्या सावंत,चारूदत्तदेसाई, क्रीडा उपसंचालक शेखर साखरे क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर व अन्य उपस्थित होते. दिनेश म्हाडगुत यांनी पुढील मुद्द्यावर विशेष प्रकाश टाकला. प्रत्येक शाळेत एक क्रीडा शिक्षक मिळावा याकरिता आरटीई कायद्यात संशोधन होऊन संच मान्यतेच्या निकषात बदल व्हावेत. सहावी ते दहावी किंवा सहावी ते बारावी वर्गाच्या शारीरिक शिक्षणाच्या तासिका शारीरिक शिक्षण शिक्षकास देण्यात याव्यात. 14 मे 1987 च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेत 1 शारीरिक शिक्षण शिक्षक असावा, संच मान्यतेत त्यास अतिरिक्त करू नये. शारीरिक शिक्षण शिक्षकाच्या रिक्त पदावर शारीरिक शिक्षण शिक्षकाचीच पदभरती करावी. संरक्षण शास्त्र, एम.सी.सी., स्काऊट गाईड, आर. एस. पी. हे विषय शारीरिक शिक्षण विषयाशी निगडीत असल्याने या विषयाच्या तासिका शारीरिक शिक्षण शिक्षकास अध्यापनास द्याव्यात. मेगा भरतीमधील शारीरिक शिक्षण शिक्षकाच्या पदाची पूर्ण कार्यभाराची जाचक अट रद्द करून पूर्वीप्रमाणे शारीरिक शिक्षण शिक्षकाची बायपोकल पध्दतीने भरती करण्यात यावी. 24 वषार्ंनंतर शारीरिक शिक्षण शिक्षकास मिळणारी निवड श्रेणीसाठी एम. पी. एड. ची जाचक अट रद्द करण्यात यावी. खेळाडू स्पर्धेत जाताना अथवा परतताना किंवा स्पर्धे दरम्यान अपघात होतात, पण यासाठी विमा तरतुद लागू नाही ती करण्यात यावी. खेळाडूसाठी स्वतंत्र अपघात विमा उतरविण्यात यावा. क्रीडा धोरणातील सर्व तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल तात्काळ सुरू करावीत. खेळाडूसाठी निवासी वसतीगृहे बांधण्यात यावीत तसेच नैसर्गिक व भौगोलिक प्रदेशाचा विचार कोकण बोर्डाप्रमाणे सिंधुदुर्ग,रत्नागिरी व रायगड मिळून शालेय क्रीडा स्पर्धेसाठी स्वतंत्र विभाग करण्यात यावा. शिक्षण मंत्र्यांना या आशयाचे लेखी निवेदनही यावेळी सादर केले. क्रीडा शिक्षक महासंघाने उपस्थित केलेल्या अनेक मुद्यांचा उल्लेख करीत अनेक मागण्या मान्य असल्याची व लवकरच पूर्तता करणार असल्याची ग्वाही ना.अशिष शेलार यांनी सभेत दिली.
