‘कोकण रेल्वेच्या गणेशोत्सव विशेष गाड्यांना मुदतवाढ मिळावी’

0

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकण रेल्वेच्या मार्गावर गेल्या १५ ऑगस्टपासून विशेष गाड्या सुरू झाल्या आहेत. त्या येत्या ५ सप्टेंबरपर्यंत जाणार आहेत. या गाड्यांना सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला तरी चाकरमान्यांनी नंतर मात्र चांगला प्रतिसाद दिला आहे. परतीच्या प्रवासात तर अनेक गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर मुंबईतून कोकणात गेलेले चाकरमानी पुन्हा मुंबईत येणार आहेत. कोकण रेल्वेमुळे त्यांना कमीत कमी खर्चामध्ये तसेच सोशल डिस्टंन्सिंग पाळून मुंबईमध्ये परतणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरनंतरही पुढे काही काळ या गाड्या सुरू ठेवणे आवश्यक आहे. मुंबईत आल्यानंतर त्यांना आपापल्या घरी जाणे सोयीचे व्हावे, यासाठी लोकलमधून प्रवास करण्याची मुभाही त्यांना मिळावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक आणि सचिव यशवंत जड्यार यांच्या सहीच्या या पत्राच्या प्रती कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गुप्ता, मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:34 PM 27-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here