शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नही; आ. उदय सामंत

0

रत्नागिरी : शाळांच्या सुगम-दुर्गम यादीत चुकीचे सर्वेक्षण झाले आहे. नव्याने भरती होणार्‍या शिक्षकांना चांगली शाळा देण्यासाठी 25 वर्षे सेवा बजावलेल्या शिक्षकांना दुर्गम शाळेत पाठवण्यात आले आहे. शिक्षक भरतीनंतर जुन्या शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे प्रतिपादन म्हाडा अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन रत्नागिरीतील जयेश मंगल पार्क येथे रविवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. दीपप्रज्वलित करून अधिकवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रस्तावना समितीचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार पंडित यांनी केली. आ. सामंत म्हणाले की, जिल्हातंर्गत शिक्षक बदलीत काही शिक्षक विस्थापित झाले असून, महिला शिक्षकांवरही अन्याय झाला आहे. जिल्हा परिषदेतील पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराला चाप लावला पाहिजे. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनेकांनी शाळा सुरू केल्या पण पटसंख्येचे कारण देत या शाळा बंद पाडल्या जात आहेत. यामुळे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पायपीट वाढली आहे. पूर्वीच्या आणि आजच्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. आता इंग्रजीचे प्राबल्या वाढत आहे. ज्यांनी मराठीतून डीएड ही पदवी घेतली आहे. त्यांना इंग्रजीतून शिकवणे अवघड जात आहे. यासाठी संघटनांनी पुढाकार घेऊन शिक्षकांसाठी इंग्लिश स्पिकिंग कोर्सचे आयोजन केले पाहिजे. शिक्षक समितीच्या शैक्षणिक चळवळीसाठी राज्य पातळीवर भुखंडाची मागणी समितीचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार पंडित यांनी केली होती. या जागेसाठी प्रस्ताव पाठवा त्याला तत्काळ मंजुरी देतो, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. याबरोबरच शिक्षक समन्वय समितीवर सुनील साळवी आणि अरविंद जाधव यांची निवड करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. काही राजकीय नेते मतांसाठी संघटनेचा फायदा करून घेतात. अशा नेत्यांना वेळीच बाजुला सारा. जे तुमचे प्रश्‍न सोडवतील त्यांनाच पाठिंबा द्या, असेही ते म्हणाले. यावेळी समितीचे राज्य सल्‍लागार चंद्रकांत आणावकर यांनी प्राथमिक शिक्षक समितीचा संघर्षमय इतिहास, सद्यस्थितीतील शैक्षणिक धोरण व समाज अन् शिक्षकांपुढील आव्हाने यावर संघटनात्मक मार्गदर्शन केले. यावेळी समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, शिक्षण सभापती सहदेव बेटकर, आणि शिक्षक सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल मोरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here