रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनागोंदी कारभार हळुहळू उजेडात येऊ लागला आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी चांगली सेवा देत असताना जिल्हा शल्य चिकित्सकांचा मनमानी कारभार रुग्णालयाची प्रतिमा मलीन करू लागला आहे. वैद्यकीय बिलांच्या फाईल्स जिल्हा शल्य चिकित्सकांच्या टेबलवर असूनही ती बिले मंजूर करणे, अथवा नामंजूर करणे जिल्हा शल्य चिकित्सकांना जमलेले नाही. त्यामागे काहीतरी ‘अर्थ’ असावा, असा सूर कर्मचारी आणि अधिकार्यांसह रुग्णांमधून उमटत आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयात विविध शासकीय अधिकारी, कर्मचार्यांच्या वैद्यकीय बिलाच्या फाईल मार्च महिन्यापासून पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यावर या फाईल्स जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बोल्दे यांच्या टेबलवर पडून असल्याची माहिती पुढे आली आहे. डॉ. बोल्दे हे या फाईल्सची दखल घेत नसून त्यामुळे ज्यांच्या फाईल्स आल्या आहेत, त्यांच्या हक्काची बिलेही त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे नाराजीचा सूर आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बोल्दे यांचा आणखीही मनमानीचा प्रकार पुढे आला आहे. कर्मचारी वा वैद्यकीय अधिकार्यांना अत्यावश्यक कारण असतानाही सुट्टी दिली जात नाही. दमदाटी करण्याचे प्रकारही होत असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, फिटनेस सर्टीफिकेटसाठी गेलेल्या काही पोलिस कर्मचार्यांनाही शल्य चिकित्सकांच्या मनमानीचा अनुभव नुकताच आला आहे. फिट असताना अनफिट शेरा देऊन नंतर तो फिट आहे, अशी खाडाखोड करून देण्याचा उपद्व्यापही जिल्हा शल्य चिकित्सकांकडून करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. रूग्णालयात वीज गेल्यानंतर जनरेटरची व्यवस्था नसताना त्यावर जिल्हा शल्य चिकित्सकांनी कोणतेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे वीज गेल्यावर रुग्णांना अंधारात रहावे लागते. रुग्णालयात उत्तम सेवा देण्यावर भर देण्यापेक्षा मनमानी कारभाराकडे जास्त लक्ष असल्याचे दिसत आहे. वैद्यकीय बिलांसाठीही जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून कर्मचारी वा अधिकारी येत असतात. मात्र त्यांची बिले लालफितीत अडकवून ठेवण्यात आली आहेत. यामागे काहीतरी ‘अर्थ’ असावा, असा सूर येत आहे.
