मुंबई : संपाच्या बाजूने बेस्ट कामगारांनी कौल दिला आहे. त्यामुळे सोमवारी प्रशासनाने कामगारांच्या विविध मागण्यांबाबत तोडगा न काढल्यास सोमवार मध्यरात्री 12 वाजल्यापासून बेस्ट कामगार संपावर जाण्याची शक्यता आहे. बेस्ट उपक्रमाच्या 98 टक्के कर्मचार्यांनी संपाच्या बाजूने अवघ्या 2 टक्के कर्मचार्यांनी संप करू नये असा कौल दिला आहे. प्रशासनाला चर्चेला अजून काही अवधी देण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून वडाळा आगर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्या मध्यस्थीने महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी कामगार नेत्यांची अंतिम चर्चा होईल. गरज भासल्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर मध्यस्थी करण्याची शक्यता असून, पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी उपस्थित राहणार असल्याचे समजते. या बैठकीत तोडगा निघाला नाही तर, किमान एक दिवसीय संप होण्याची दाट शक्यता आहे. तातडीने तोडगा काढा, अन्यथा बेस्ट कामगार संपावर जातील, असा इशारा कामगार नेते शशांक राव यांनी दिला आहे.
