रत्नागिरी : विविध योजनातून जिल्हा परिषदेला मिळणारा निधी बँकेत ठेवण्यात येतो. त्यावर मिळणारे व्याज हे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचा मोठा पर्याय आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात केलेल्या गुंतवणुकीवरील व्याजामधून तीन कोटी सहा लाख रुपये मिळणार आहेत. जिल्हा परिषद ही योजनांच्या अंमलबजावणीची यंत्रणा आहे, शासनाकडून आलेल्या योजनांवर नियंत्रण या माध्यमातून ठेवले जाते. त्यासाठी शासनाकडून विविध स्कीमधून जिल्हा परिषदेकडे निधी वर्ग केला जातो. मार्च अखेरपर्यंत निधी खर्ची टाकण्यात येतो. तोपर्यंत आलेला निधी बँकांमध्ये ठेवला जातो. दरवर्षी काही कोटींचा निधी मिळतो. २०१९-२० मध्ये ट्रान्स्फर स्कीममधून सुमारे ५७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. त्यावर साधारण पावणेदोन कोटीहून अधिक रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर इतर गुंतवणुकीतुनही सुमारे सव्वा कोटीहून अधिक व्याज मिळणार आहे. २०१८-१९ ला तीन कोटी १४ लाख, २०१७-१८ मध्ये १ कोटी ९२ लाख, २०१६-१७मध्ये १ कोटी २३ लाख रुपये मिळाले होते. जिल्हा नियोजनमधून गेली दोन वर्षे सर्वाधिक निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षात व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसत आहे. व्याज हे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन असल्यामुळे जिल्हा परिषदेला विविध विकास योजना राबविणे शक्य होणार आहे.
