कोरोना संकटातही 99 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात जि. प.च्या आरोग्य विभागाला यश

0

रत्नागिरी : जगामध्ये कोरोना व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशासह संपूर्ण महाराष्ट्रात मार्चपासून लॉकडाऊन लागला असून, त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नियमित लसीकरणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नामुळे गेल्या चार महिन्यांत 99.40 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरवर्षी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत शिशु, मुले आणि गर्भवती महिलांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येते. त्यामध्ये गर्भवती महिलांच्या टीटी (1,2) आणि बूस्ट, शिशुसाठी बीसीजी, हेपॅटिटीस, ओपीव्ही-ओ, ओपीव्ही (1,2,3), डीटीपी (1,2,3), डीटीपी (1,2,3), हेपॅटीटीस बी (1,2,3), गोवर, गोवर (बूस्टर), व्हिटामिन ए (पहिला डोस) तर बालकांच्या डीपीटी बूस्टर, ओपीव्ही बूस्टर, गोवर बूस्टर, जीवनसत्त्व-अ (2 ते 9), टीटी आदी लसींचा समावेश आहे. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात नागरिकांमध्ये कोरोनाची भीती होती. मार्च महिन्याच्या शेवटी नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली होती. मात्र, आरोग्य कर्मचार्‍यांनी नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याबरोबरच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून लसीकरणाचे नियोजन केले होते. त्या नियोजनला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नियमित लसीकरणापासून अवघ्या एक टक्क्यापेक्षा कमी लाभार्थी वंचित राहिले आहे. ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल. लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या कालावधीत 5 हजार 656 लाभार्थ्यांपैकी तब्बल 5 हजार 622 लाभार्थ्यांना लस देण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:32 AM 31-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here