आशा सेविकांच्या वाढीव मानधनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी

0

रत्नागिरी : कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचार्यांयच्या खांद्याला खांदा लावून आशा सेविका गावोगावी सर्वेक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना कोरोनाकाळात मानधन वाढवून देण्याचा निर्णय शासनाकडून झाला होता. मात्र प्रशासनाकडून या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, ती करावी, अशी मागणी युवा सेनेचे चिपळूण तालुकाधिकारी उमेश खताते यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही वर्षांपासून मिळणाऱ्या दोन हजार रुपयांच्या अल्प मानधनावर काम करणार्या या आशा सेविका गरोदर माता, लहान मुलांचे सर्वेक्षण करतात. त्याचबरोबर तापाचे रुग्ण, मलेरिया, डेंग्यू, कुष्ठरोग, क्षयरोगाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करतात. प्रधान मंत्री मातृत्व योजना, जननी सुरक्षा योजनेच्या सर्वेक्षणासाठी त्यांना रुग्णामागे मानधन मिळते, तेही अत्यल्पच आहे. करोना काळात या आशा सेविका आरोग्य कर्मचार्यांच्या बरोबरीने रुग्णांचे सर्वेक्षण करत असून धोक्याच्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांची अत्यल्प मानधनावरच बोळवण केली जात आहे. करोना काळात त्यांना ग्रामपंचायत स्तरावर दर महिना एक हजार रुपये वाढीव मानधन देण्याचे जाहीर करण्यात आले होते. एप्रिल महिना वगळता पुढील एकाही महिन्याचे वाढीव मानधन त्यांना मिळालेले नाही. एक हजार वाढीव मानधनाचे दिवसाला केवळ तीस रुपये होतात. ही रक्कम अत्यल्प असली तरी त्या तीस रुपयांसाठी त्या महिलांची पायपीट सुरू आहे. आशा सेविकांना करोना योद्धा म्हणून ५० लाखांचे विमा कवच आणि लागण होणार्या कर्मचार्यांयना मोफत उपचार मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीचा गंभीरपणे विचार व्हावा, अशी मागणी खताते यांनी खासदार राऊत यांच्याकडे केली. आशा सेविकांच्या प्रश्नांवर खा. विनायक राऊत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मंत्रालयीन स्तरावर तातडीने हा प्रश्न् सोडवण्याचे आश्वािसन त्यांनी दिले. पालकमंत्री अनिल परब, आ. भास्कर जाधव यांच्याकडेही याबाबतचे पत्र दिले आहे, असे श्री. खताते यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:21 AM 31-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here