रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने २० किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान (लगेज) असल्यास पाचपट भाडे आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि.२७ ऑगस्टपासून सामानाच्या तिकीटाचे किमान भाडे पाच रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत किमीनुसार आकारण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने जून २०१९ मध्ये प्रवासी भाड्यात वाढ केली होती. तर सन २०१८ मध्ये सामान तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता प्रवाशांच्या सामानाची भाडेवाढ करण्यात आली आहे. प्रवाशांजवळ असलेले २० किलोपेक्षा कमी वजनाचे सामान एसटीमधून मोफत घेऊन जाता येणार आहे.सुट्या पैशांचे चलन अत्यंत अल्प झाले आहे. सुटे पैशाअभावी वाहक आणि प्रवासी यांच्यात वाद होतात. यामुणे प्रवासी सामान भाडे पाच रुपयांच्या पटीत आकारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सामानाची भाडेवाढ केली आहे. मात्र वाहकांकडे असलेल्या ईटीआयएम मशीनमध्ये सामानाचे पाचपटीचे दर आकारण्याची सुविधा नाही. त्यामुळे वाहकांना सामानाचे भाडे आकारताना अडचणी येतील. यासाठी तिकीट मशीन सुधारण्यात येणार आहेत.
