बिआरित्झ (फ्रान्स) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्समध्ये होणाऱ्या जी-७ देशांच्या बैठकीमध्ये सहभागी होत आहेत. या बैठकीदरम्यान त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबर भेट होणार असून यावेळी काश्मीर मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांचे काल, रविवारी बहारीन येथून फ्रान्समध्ये आगमन झाले. यासाठी त्यांना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांनी खास निमंत्रण दिले होते. फ्रान्समधील बिआरित्झ येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींची ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांच्याबरोबर पहिली द्विपक्षीय चर्चा झाली. तर आज ट्रम्प यांच्या बरोबर द्विपक्षीय चर्चा होणार आहे. काश्मीरमधील तणावस्थिती कमी करण्यासाठी भारताने काय उपाय केले आहेत हे ट्रम्प यांना जाणून घ्यायचे आहे. याबाबत बोलताना एका अमेरिकेच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यामधील द्विपक्षीय चर्चेदरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील संबंधाचा मुद्दा पुढे येण्याची शक्यता आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटविणे हा भारताचा अंतर्गत निर्णय आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक तणाव कमी करण्याबाबत मोदींची भूमिका कशी आहे हे ट्रम्प यांना जाणून घ्यायचे आहे. जी-७ देशांमध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, अमेरिका, कॅनडा आणि जपान या देशांचा समावेश आहे. बिआरित्झ येथे होत असलेल्या या परिषदेत अॅमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग, व्यापार युद्ध आदी विषयावर चर्चा होणार आहे.
