मुंबई : मराठा समाजाच्या मागण्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरून आज (ता.२६) मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मोर्चा काढण्यात आला. आबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरवात झाली. या मोर्चात तरुण, तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आझाद मैदान पोलिसांनी मंत्रालयावरील मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानावर आला. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाचे बापाचे अशा घोषणा देत मराठा बांधवांनी हा परिसर दणाणून सोडला. यावेळी मराठा बांधवांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. भगवे ध्वज मोर्चात आणले होते यामुळे हा परिसर भगवामय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हा मोर्चा आझाद मैदान प्रवेशद्वार येथे आला. यावेळी आबासाहेब पाटील म्हणाले, राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला आहे. मात्र, अधिकारी वर्ग यांची अंमलबजावणी करीत नसल्याने मराठा समाजाला याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने जर का सकारत्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन अटळ असल्याचे ते म्हणाले. याबाबत आज, दुपारी जिल्ह्यामधून समन्वयक येणार आहेत त्यांच्या बरोबर चर्चेनंतर पुढील निर्णय घेऊ असे पाटील यावेळी म्हणाले.
