गणेशोत्सवासाठी मुंबई – कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ

0

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबई – कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, यंदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ कामे सुरू असून, ते तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याचबरोबर अनेक भाविक मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जात असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई -कोल्हापूर मार्गे कोकणात जाणा-यां वाहनांना टोल माफ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आढावा पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार,गृहनिर्माण राज्य मंत्री रविंद्र वायकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक,रस्ते विभागाचे सचिव सी.पी.जोशी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाचे सचिव अजित सगणे,राष्ट्रीय महामार्गाचे श्री देशपांडे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. पावसाने उघडीप दिल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही जलदगतीने सुरु असून,जिथे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तिथे आवश्यकतेनुसार, रोड स्ट्रीप्स, सूचना करणारे बोर्ड, गावांची नावे, जंक्शन बोर्ड, रॅम्बलर पट्टी, गतीरोधक लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here