पालशेतजवळ बेकायदेशीर वाळू उत्खनन

0

गुहागर : महसूल खात्याची कोणत्याही प्रकारची वाळू उत्खनन व वाहतुकीबाबत परवानगी न घेता गेले अनेक दिवस मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत पालशेत आंबोशी बंदराच्या मुखाजवळ बेकायदेशीर वाळू उत्खनन चालू आहे. त्याबाबत महसूल विभागाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती सागरी सीमा मंचाचे कोकण प्रांत प्रमुख संतोष पावरी यांनी दिली. ते म्हणाले, या विषयाची माहिती वेळोवेळी संबंधित प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील यांना लिखित स्वरूपात दिली आहे. गेल्या २४ ऑगस्ट रोजी पालशेत येथील श्री आगडी देवी मंदिरात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. त्यावेळी खारवी समाजातील प्रमुख कार्यकर्ते प्रमोद पालशेतकर, महेश पाटील, विकास दाभोळकर, रामा पालशेतकर, संदेश हेदवकर, प्रवीण पालशेतकर, चंद्रशेखर पटेकर, ज्ञानेश्वर पाटील, दिनेश पालशेतकर, प्रशासनाच्या वतीने सर्कल अधिकारी मोरे, पालशेतचे तलाठी कातयाडी, तंटामुक्ती अध्यक्ष वैभव काळे उपस्थित होते. बेकायदेशीर वाळू उत्खनन होणाऱ्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. बैठकीत या विषयाची विस्तृत माहिती खारवी समाज बांधवांकडून देण्यात आली. या विषयाकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे गांभीर्याने लक्ष वेधण्यात आले. प्रशासकीय अधिकाऱ्यानी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. असे असले, तरी काल मध्यरात्री पुन्हा एकदा वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची चाहूल खारवी समाज बांधवांना लागली. त्वरित समाजातील प्रमुख कार्यकर्ते एकत्र झाले. पहाटे ३च्या सुमारास एम एच १६ बी २२६५ या क्रमांकाच्या टेम्पोतून २ ब्रास वाळूचे उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. त्याच्या मागावर कोणी असल्याचे लक्षात येताच टेम्पोचालकाने टेम्पो उमेश अरविंद जोशी यांचे बागेशेजारील जागेत उभा करून तो पळून गेला. या विषयाची माहिती त्वरित सर्कल अधिकारी मोरे यांना फोनवरून देण्यात आली. नंतर घटनास्थळी तलाठी कातयाडी व पोलीस पाटील गद्रे उपस्थित झाल्या. चोरट्या वाळूचा पंचनामा करण्यात आला. दोन ब्रास वाळूपैकी टेम्पोत अर्धा ब्रास व टेम्पोखाली अर्धा ब्रास, तर एक ब्रास वाळू श्री आगडी देवी मंदिराच्या मुखाजवळ साठा केल्याचे निदर्शनास आले. पकडलेला टेम्पो आणि वाळू पोलीस पाटलांच्या ताब्यात देण्यात आली. पुढील आवश्यक कार्यवाही प्रशासनाने केली नाही, तर आंदोलन केले जाईल, असे सागरी सीमा मंचाच्या कोकण प्रांताचे प्रमुख श्री. पावरी यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:59 PM 01-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here