वाशिष्ठी नदीतील पाण्याचा एक थेंबही देणार नाही; शौकत मुकादम

0

चिपळूण : चिपळूण-कराड रेल्वे मार्गासाठी शासनाकडे पैसा नसल्याचे कारण एकीकडे दिले जाते, तर दुसरीकडे मराठवाड्यात वाशिष्ठीचे पाणी नेण्यासाठी हजारो कोटी रूपये शासन खर्च करणार आहे. त्यामुळे वाशिष्ठी नदीतील पाण्याचा एक थेंबही अन्यत्र जावू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे राज्य उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे. मुकादम म्हणाले की, वाशिष्ठी नदीच्या पाण्यावर संपूर्ण परिसरात दहा हजार बोअरवेल, दोन हजार विहिरी व दोनशेहून अधिक पाणी योजना अवलंबून आहेत. अनेकवेळा वाशिष्ठी नदीचे पाणी अन्यत्र नेण्याचा प्रयोग झाला. मात्र, तो यशस्वी झाला नाही. परंतु आता मात्र हे पाणी विदर्भ, मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णय शासन घेत आहे. असे झाले तर चिपळूण तालुक्यासह बहुतांश कोकणातील भागात पाण्याची तीव्र टंचाई भासेल. या नदीच्या पाण्यावर खेर्डी, गाणेखडपोली, लोटे आदी औद्योगिक वसाहतींसह आरजीपीपीएलसारखे उद्योग अवलंबून आहेत. त्यामुळे भविष्याचा विचार करुन वाशिष्ठी नदीतील पाणी अन्य भागात नेऊ दिले जाणार नही अन्य भागात हे पाणी गेले तर चिपळूणवासीयांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागेल. ही बाब लक्षात घेता वाशिष्ठीतील एक थेंबही अन्यत्र जावू नये, यासाठी जनआंदोलन उभे . करण्याचा इशारा मुकादम यांनी दिला आहे. एखादा प्रकल्प कोकणात आणायचा असेल तर त्यासाठी कोकणवासीयांना व लोकप्रतिनिधी, राजकीय मंडळींना बरेच प्रयत्न करावे लागतात. चिपळूण-कराड रेल्वे मार्ग एक हजार कोटी रूपयांचा प्रकल्प मंजूर होऊनही अद्यापही मार्गी लागलेला नाही. यातूनच कोकणच्या विकासाकडे दुजाभाव केला जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, असे मुकादम यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here