मुंबई : विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे, या मागणीसाठी आझाद मैदानावर ५ ऑगस्टपासून धरणे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना पोलिसांनी सोमवारी अमानुष मारहाण केली. यात ९ शिक्षक जखमी झाले असून १० ते १५ जणांना अटक करण्यात आली आहे, तर इतर शिक्षकांना आझाद मैदानात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांच्या या अमानुषपणाचा तीव्र निषेध शिक्षकांनी केला असून बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानाविषयी निर्णय झाला नाही तर, मंत्रालयात घुसू, असा इशारा आता शिक्षकांनी दिला आहे. त्यामुळे शिक्षक आणि सरकारमधील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील सुमारे ४५०० हजार शाळा अनुदानापासून वंचित आहेत. या शाळांना अनुदान मिळावे ही मागणी १९ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे आक्रमक शिक्षकांनी ५ ऑगस्टपासून आझाद मैदानासह राज्यभर धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र अजूनही याबाबत निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधीची फाईल मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश देऊनही वित्त विभाग आणि शिक्षण विभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळेच गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फाईल पुढे आली नाही. आता मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळात ही फाईल ठेवण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती शिक्षकांना समजली. त्यातही वित्त विभागाच्या एका अधिकाऱ्याने ४५०० पैकी काही शाळा बोगस असल्याचा शेरा एका प्रतिज्ञापत्रात दिल्याचीही माहिती आझाद मैदानावर आंदोलनास बसलेल्या शिक्षकांपर्यंत पोहचली. परिणामी शिक्षक संतप्त झाले नि शिक्षकांनी थेट जेलभरो करण्याचा निर्णय घेतला. पण जेलभरो सुरू होण्याआधीच सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास लाठीचार्जला सुरुवात झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मुंबई अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी ‘प्रहार’ला दिली आहे. पोलिसांनी आंदोलकांना अडवत अटक करणे समजू शकते. पण थेट त्यांच्यावर अमानुष मारहाण करणे ही मुजोरी असून याचा शिक्षक जाहीर निषेध करत असल्याचेही रेडीज यांनी स्पष्ट केले आहे. या मारहाणीत ९ जण जखमी झाले असून ते कुठे आहेत याची माहितीही पोलीस देत नसल्याचा शिक्षकांचा आरोप आहे.
