कशेडी घाटात धावत्या कारने घेतला पेट आणि जीव वाचविण्यासाठी घडला एकच थरार

0

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी रात्री धावत्या कारने पेट घेतला. त्यानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने कारमधील प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. मात्र वेळेत मिळालेली मदत आणि दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेतून तिघेही प्रवाशी सुखरुप बचावले. मालेगाव येथील भंगार व्यवसायिक इस्माईल शेख शब्बीर हे आपले सहकारी रमझान इब्राहीम शहा आणि सरोज निजामुद्दीन खान यांच्यासोबत चिपळूण तालुक्यातील खेर्डी औद्योगिक वसाहतीत भंगार घेण्यासाठी आले होते. बुधवारी रात्री ते परतीच्या मार्गावर असताना महामार्गावरील कशेडी घाटात त्यांच्या वॉक्स व्हॅगनने अचानक पेट घेतला. कारमधून धुर यायला लागताच चालक इस्माईल यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी करून कारमधून उतरण्याचा प्रयत्न केला मात्र कारचे चारही दरवाजे लॉक झाल्याने ते सर्वजण कारमध्येच अडकून पडले. आता आपले पुढे काय होणार याची कल्पना आलेल्या या तिघांनीही आरडा-ओरडा सुरु केल्यानंतर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्यांना कारचा मागील दरवाज्यातून बाहेर काढले. हे तीन्ही प्रवाशी कारच्या बाहेर पडताच संपुर्ण कारला आगीने वेढले आणि काही क्षणातच ती कार आगीच्या भक्षस्थानी पडली. कारमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे कशेडी घाटातील हा बर्निंग कारचा थरार कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांच्याही जीवावर बेतणारा होता. मात्र त्यांचे दैव बलवत्तर म्हणून हे तीघेही प्रवाशी या जिवघेण्या अपघातातून वाचले. खेड पोलिसांनी या घटनेची अपघाताची नोंद केली असून पोलीस प्रकाश मोरे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:07 PM 03-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here