आता नागरिकांना मिळणार ई-लोगोचा ‘7/12’

0

पुणे : जमिनिंच्या व्यवहारासाठी सातबारा खूप महत्त्वाचा असून जुन्या पद्धतीने असलेला सातबारा आता नव्या आणि सुटसुटीत स्वरुपात मिळणार आहे. सध्या सगळे व्यवहार हे संगणकाच्या माध्यमातून होतात. त्यामुळे काळाची गरज लक्षात घेत नवीन सातबारा तयार करण्यात आला आहे. संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्यास मान्यता दिल्यानंतर संगणीकृत उतारा तयार करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात नव्या स्वरुपातील सातबारा उतारा नागरिकांना उपलब्ध होणार आहे. 50 वर्षानंतर पहिल्यांदाच बदल करण्यात आलेल्या सातबारा उताऱ्यावर शासनाचा व ई. महाभूमीचा लोगो असलेला वॉटर मार्क तसेच गावाच्या नावाचा कोड असणार आहे. राज्याच्या अनेक भागात अद्यापही जमिनींच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून सातबारा उतारा वापरला जातो. अनेकदा बनावट सातबारा उतारा दाखवून जमीन लाटणे, त्याची खरेदी-विक्री करणे, बँकेतून कर्ज घेणे आदी प्रकार यापूर्वी घडले आहेत व घडत आहेत. सातबारा उतारा हा शासकीय भाषेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना तो समजत नाही. त्यातून हे प्रकर घडतात.त्यामुळे शासनाने संगणीकृत साताबारा उतारा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. फसवणूक होऊ नये यासाठी संगणीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला होता. तसा प्रस्तावही राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. अप्पर सचिव नितीन करीर, जमावबंदी आयुक्त एस. चोकलिंगम् यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्यास मान्यता देण्यात आली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

असा असेल नवी 7/12 उतारा

– आता गाव नमुना सातबारा 8 (अ) मध्ये वरच्या बाजूला मध्यभागी महाराष्ट्र शासनाचा लोगो व ई-महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वॉटर मार्क असणार आहे.
– गावाचे नावासोबत एलजीडी कोड (लोकल गर्व्हमेंट डिरेक्टरी) कोड असणार आहे.
– लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र (अ+ब) स्वतंत्ररीत्या दर्शवण्यात येणार आहे.
– शेती क्षेत्रासाठी हे आर.चौ.मी. आमि बनशेती क्षेत्रासाठी आर.चौ. मी. हे दर्शवले जाणार आहे.
– खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात कंसात नमूद केला जात होता. तो आता खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाणार आहे.
– मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करुन दर्शवल्या जात होत्या. आता कमी केलेली नावे व नोंदी कंस करुन त्यावर एक आडवी रेषा मारुन खोडून दर्शवण्यात येणार आहे.
– नमुना 7 वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शवण्यात येणार आहे.

सातबारा उतारा अधिक सुटसुटीत व सोपा व्हावा आणि तो माहितीपूर्ण व्हावा, यासाठी संगणीकृत सातबारा उताराच्या नमुन्यामध्ये बदल करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसात राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य ई फेरफार प्रकल्पाचे समन्वयक रामदास जगताप यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:57 PM 04-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here