कुडाळ तालुक्यातील केळूस, तेंडोली ग्रामस्थांचे जिल्हा दूरसंचार कार्यालयासमोर उपोषण

0

सावंतवाडी : कुडाळ तालुक्यातील केळूस, तेंडोली गावातील बीएसएनएल मोबाईल टॉवर 2018 पासून बंद आहे. आता गणेशोत्सव तोंडावर आला तरी दूरसंचारचे अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. हा टॉवर तत्काळ सुरू करा, या मागणीसाठी या गावातील मोबाईल ग्राहक आणि ग्रामस्थांनी सावंतवाडी येथील दूरसंचार जिल्हा प्रबंधक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, नगराध्यक्ष बबन साळगावकर व भाजप चिटणीस  राजन तेली यांनी बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक  ए. एस. होने यांच्याशी चर्चा केली.  टॉवर तत्काळ सुरू न केल्यास तुम्हाला ऑफिसमध्ये बसणे मुश्कील होईल, असा इशारा जिल्हा प्रबंधकांना दिला. या भागामध्ये अन्य कोणतीही मोबाईल सेवा नाही. फक्‍त बीएसएनएलच्या मोबाईल सेवेवर येथील ग्राहक अवलंबून असून तत्काळ हा मोबाईल टॉवर सुरू करण्यात यावा यासाठी राज्य स्तरावरून केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांपर्यंत आपण संपर्क साधू, असे आश्‍वासन उपोषणकर्त्यांना तेली यांनी दिले.  उपनगराध्यक्षा अन्‍नपूर्णा कोरगावकर, जि. प.  उपाध्यक्ष  रणजित देसाई ,  न. प. पाणीपुरवठा सभापती सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका शुभांगी सुकी, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.  उपोषणकर्ते  कुडाळचे माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, तेडोंली सरपंच मंगेश प्रभू, केळुस उपसरपंच  आबा खवणेकर, आंदुर्ला माजी सरपंच सौ.आरती पाटील ,  माजी सरपंच मनोहर राऊळ, उपसरपंच ज्ञानेश्वर तांडेल , ग्रा. पं.सदस्य अक्षय तेंडोलकर , सौ.प्रमोदिनी मेस्त्री, धोंडू मुणगेकर , मंगेश सर्वेकर ,  या सौ.मीनाक्षी नागडे, सोसायटी चेअरमन महेश राऊळ, नागेश आरोलकर, संदीप तांडेल आदींसह या तीनही गावातील महिला ग्राहकही उपस्थित होते. केळूस -तेंडोली गावातील टॉवरवरुन  गेली कित्येक वर्षे  चांगली सेवा मिळत होती. परंतु एक वर्षांपासून हा टॉवर जीटीएल कंपनीने बंद केल्यामुळे गावातील मोबाईल ग्राहकांची गैरसोय झाली आहे. नुकत्याच झालेल्या पूरस्थिती मध्ये आंदुर्ले -केळूसवाडी, कालवी बंदर, माईनवाडी, तळेवाडी येथील मच्छीमारांना  नेटवर्क अभावी मन:स्ताप सहन करावा लागला. गावांमध्ये कोणतेही नेटवर्क उपलब्ध नसल्याने शेतकरी, सामान्य नागरिक आणि विद्यार्थी यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावेे लागत आहे. नवीन टॉवर कार्यान्वित होण्यासाठी अजून चार तेेेे पाच महिन्यांचा अवधी लागणार आहे. अशा स्थितीत तोंडावर आलेल्या गणेश चतुर्थीमध्ये  होणारी गैरसोय दूर करण्यासाठी  टॉवर तत्काळ सुरू करण्याची गरज असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या मागणीसाठी  या ग्रामस्थांनी जिल्हा प्रबंधक कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, गावातील नवीन टॉवर सुरू करण्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्यदिन  केळुस गावचे उपसरपंच आबा खवणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी नव्याने उभारण्यात येणार्‍या मोबाईल टॉवरसाठी   फंड उपलब्ध नसल्यानेे हा टॉवर कार्यान्वित करण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे अखेरीस ग्रामस्थांनी उपोषण आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here