सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील एसटी बस स्थानक परिसरातील अस्वछता तसेच इतर समस्यांबाबत येत्या दोन दिवसात निपटारा न केल्यास सावंतवाडी शहर हितवर्धक मंच च्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुरेश भोगटे यांनी दिला. सावंतवाडी शहर हितवर्धक मंचच्या वतीने सोमवारी एसटी आगारव्यवस्थापक आय. बी.सय्यद यांना घेराव घालण्यात आला. तीन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे घेराव घालूनही काही मागण्या करण्यात करण्यात आल्या होत्या, त्यांची पूर्तता अद्याप न झाल्यामुळे पुन्हा शहरमंच ने घेराव घालत जाब विचारला. सावंतवाडी एसटी बस स्थानक आवारात रात्रीच्या वेळी दोन्ही स्थानकावर सिक्युरिटी गार्ड नसतात. त्यामुळे प्रवाश्यांची विशेष करून महिला प्रवाश्यांची सुरक्षितता रामभरोसे आहे. यासाठी बसस्थानकात सुरक्षागार्ड ची संख्या वाढवण्यात यावी. गणेश चतुर्थी जवळ आली आहे. प्रवासी, चाकरमानी यांचे आगमन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. मात्र बसस्थानक आवारातील स्वछतागृहात दुर्गधी पसरली असल्याने त्यामुळे प्रवाश्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. शौचालयासाठी जाणार्या महिला प्रवाशांकडून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकार वेळीच थांबले पाहिजेत. बसस्थानक तसेच स्वछतागृहातील फलक उखडून गेले आहेत. तेथे चांगले डिजिटल फलक लावण्यात यावेत, अशी मागणी सत्यजित धारणकर यांनी केली. रात्रीच्या वेळी वेंगुर्ले स्थानक आवारात खासगी गाड्या पार्किंग करून काही युवक धिंगाणा घालतात. अशा गाड्यांवर कारवाई करावी. स्थानकावर काही ठिकाणी लाईट ची व्यवस्था नाही, तरी दोन्ही स्थानकावरील लाईट व्यवस्था सुरळीत ठेवावी. सावंतवाडी, वेंगुर्ले स्थानकावर रात्रीच्या वेळी दारुड्याकडून धिंगाणा घातला जातो, त्यांना आवर घालावा, बसस्थानक आवारातील रस्ता खड्डेमय झाला आहे त्याची डागडुजी करावी, बसस्थानक आवारात झाडी वाढली आहे,ती तोडावी.धोकादायक झाडी तोडण्यात आलेली नाहीत त्याबाबत तातडीने कार्यवाही केली जावी. सावंतवाडी आगारातून जवळच्या तसेच लांब पल्याच्या गाड्या फलकाशिवाय सोडल्या जातात, परिणामी गाडी पकडण्यासाठी प्रवाश्यांची धावपळ होते. तरी गाड्या फलकाशिवाय सोडल्या जाऊ नयेत, आदी मागण्या मंचाच्या पदाधिकार्यांनी केल्या. डेपो मॅनेजर सय्यद यांनी प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी जादा कर्मचारी नेमण्यात येतील. गाड्या फलक लावूनच सोडण्यात याव्यात यासाठी चालक-वाहकांंना मासिक बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी बस स्थानक आवारात धिंगाणा घालणार्या युवकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. स्वछतागृहे स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच गैरप्रकरांना आळा घालण्यासाठी खाजगी ठेकेदाराला सूचना करण्यात आल्या आहेत. सिक्युरिटी गार्ड ही जादा मागवण्यात येणार असून प्रवाश्यांचा सोईसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मंचचे सुरेश भोगटे, बंड्या तोरसकर, अफरोज राजगुरू, सत्यजित धारणकर, नितेश सावंत, राघवेंद्र सावंत, सचिन इंगळे, इफतेकर राजगुरू, संजय पेडणेकर, मुद्दीन सौदागर आदी उपस्थित होते.
