रत्नागिरीत दोन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल लांबवला

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या शांतीनगर आणि पाटबंधारे वसाहत या दोन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी सायंकाळी उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. याबाबत अनिता अनिल देसाई (वय ३६, रा. लांजा) आणि सुरेश यशवंत जोशी (३८, रा. पाटबंधारे वसाहत, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनिता देसाई या उमा तांबे यांच्या लांजा येथील स्टेशनरी दुकानात कामाला होत्या. त्यातून त्यांच्यात घरोब्याचे संबंध होते. उमा तांबे या मुंबईला असल्याने त्यांचे शांतीनगर येथील घर बंद असते. त्याची एक चावी अनिता देसाई यांच्याकडे असता दोन-चार दिवसांनी त्या एकदा रत्नागिरीत फेरी मारून घराची पाहणी करतात. रत्नागिरीत दोन ठिकाणी घरफोडी तसेच उमा तांबे यांची कारही घरीच असल्याने त्यांचा ड्रायव्हर वायंगणकर ही दोन चार दिवसांनी घरी फेरी मारुन गाडीची निगा राखण्याचे काम करत असतो. सोमवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी वायंगणकर तांबे यांच्या घरी कारची निगा राखण्यासाठी गेला असता त्याला घराचा मागील दरवाजा फोडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याने घरात जाऊन पाहिले असता त्याला घरातील सामान अस्ताव्यस्त पडले दिसून आले. त्याने उमा तांबेंना फोन करुन याची माहिती दिली. उमा तांबेंनी याबाबत अनिता देसाईना माहिती देऊन शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. दुसऱ्या घटनेत पाटबंधारे वसाहत येथे राहणारे सुरेश जोशी शुक्रवारी कुटुंबासोबत बाहेरगावी गेले होते.रविवारी सकाळी ते घरी परतले असता त्यांना घराचा समोरील बाजुचा दरवाजा तोडलेला दिसून आला त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना लोखंडी कपाटातील लॉकरमधून रोख रक्कम,३७ ग्रॅमचे सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. दरम्यान, शहरात पोलिस असल्याची बतावणी करुन नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांची टोळी सक्रीय झाली असतानाचा घरफोड्यांनाही सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here