रिओ डी जनैरो : ‘जगाचे फुफ्फूस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉनच्या सदाहरित आणि दाट जंगलाला लागलेली आग अजून धुमसत आहे. ॲमेझॉनच्या जंगलाला लागलेला आग विझवण्यासाठी जी ७ देशांनी देऊ केलेली मदत ब्राझीलने नाकारली आहे. जी ७ देशांनी २२ दशलक्ष डॉलर्स मदत देण्याचे मान्य केले होते. मात्र ही मदत ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी घेण्यास नकार दिला असल्याचे वृत्त आहे. प्रचंड जैवविविधतेने संपन्न असलेले ॲमेझॉनचे जंगल आगीमुळे मोठ्याच संकटात सापडले आहे. त्यामुळे जगभरातून पर्यावरणप्रेमी लोक चिंता व्यक्त करीत आहेत. गेल्या एक दशकाच्या काळातील हा सर्वात भीषण वणवा आहे. ब्राझीलच्या उत्तरेकडील रोरैमा, एक्रे, रोंडोनिया आणि अमेझोनास या राज्यांमध्ये वणव्याची झळ मोठी आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांनी जी ७ शिखर परिषदेच्या निमित्ताने ॲमेझॉनच्या जंगलातील वणव्यांनी निर्माण झालेल्या धोक्याकडे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी याबाबत मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर जी ७ देशांनी २० दशलक्ष युरो (२२ दशलक्ष डॉलर्स) देण्याचे मान्य केले होते. या आर्थिक मदतीचा वापर अग्निशमन विमाने पाठविण्यासाठी करण्यात येणार होता. मात्र, ब्राझीलने ही मदत नाकारली आहे. पृथ्वीला वीस टक्के ऑक्सिजन ब्राझीलच्या या सदाहरित जंगलापासूनच मिळत असतो. आता तेथे लागलेला हा वणवा केवळ ब्राझीलच नव्हे, तर संपूर्ण जगासाठीच चिंतेचे कारण बनला आहे.
