२०२० पर्यंत कशेडी घाट बोगद्याचे काम पूर्ण होणार : पालकमंत्री रवींद्र वायकर

0

रत्नागिरी – राज्याचे गृह निर्माण, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तसेच रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी आज पुन्हा एकदा कशेडी बोगद्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महामार्गचे अधिकारी, कंत्राटदार उपस्थित होते. या बोगद्याचे काम 2020 च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा आशावाद पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, सद्यस्थितीत दोन्ही बाजूला 150 मीटरचे काम झाले असल्याची माहितीही वाईकरांनी यावेळी दिली.

कोकणात येण्यासाठी मुख्य महामार्ग म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग. या महामार्गावरील एक अवघड आणि वळणाचा घाट म्हणजे कशेडी घाट. होळी आणि गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात याच मार्गाने येत असतात. मात्र, वेडीवाकडी वळणे असल्याने या घाटात अपघातांचे प्रमाण वाढत होते, त्यात या घाटाचे अंतर 34 किलोमीटर असल्याने, हा घाट पार करण्यासाठी 35 ते 40 मिनिटे लागत होती. दरम्यान, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, तसेच वेळ आणि अंतर वाचावे यासाठी पर्याय काढण्याची मागणी जनतेतून होत होती. त्यामुळे या ठिकाणी बोगदा व्हावा, या मागणीसाठी पालकमंत्री रवींद्र वाईकर यांनी जातीने लक्ष घातले आणि या मागणीचा पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे भोगांव गावापासून कशेडी गावांपर्यंतच्या बोगद्याच्या कामाला वेग आला आहे.

दरम्यान, कशेडी बोगदा या कामाची लांबी जवळपास 9 किलोमीटर असून त्यामध्ये पावणे दोन किलोमीटर लांबीचा बोगदा असणार आहे. यामध्ये एकसमान तीन पदरी दोन बोगदे तसेच याअंतर्गत 7 लहान आणि 5 मोठे पूल असणार आहेत. दरम्यान, दोन्ही बोगद्याच्या 300 मीटर अंतरावर सुरक्षिततेच्या दृष्टीने जोडरस्ता ठेवण्यात आला आहे. या सर्व कामासाठी 743 कोटी रुपये खर्च येणार आहे. पैकी 502 कोटी रुपये खर्च बोगद्याच्या कामासाठी करण्यात येणार आहे. तर या कामाच्या भूसंपादनावर 84 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र वाईकरांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here