रत्नागिरी जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीसचा एक रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लेप्टोस्पायरोसीसचा रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाने खबरदारीच्या सूचना जाहीर केल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथील एक व्यक्ती लेप्टोस्पायरोसीसबाधित सापडली आहे.
याआधीही जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीची साथ परसली होती. त्यावेळी संशयित रुग्णांची संख्या 34 होती. सर्वाधिक संशयित 19 रुग्ण संगमेश्वर तालुक्यात सापडले होते. त्याव्यतिरिक्त दापोली आणि लांजामध्ये प्रत्येकी 3, राजापूरमध्ये 4, रत्नागिरी, मंडणगड, चिपळूण, गुहागर, खेड तालुक्यात प्रत्येकी एक संशयित रुग्ण सापडला होता.
लेप्टोस्पायरोसीसबाधित पहिला रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारीच्या सूचना जाहीर केल्या आहेत. या आजारात ताप, डोकेदुखी, कावीळ, रक्तस्त्राव होऊन मूत्रपिंड, यकृताचे काम बंद पडून मृत्यू ओढवू शकतो. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दुषित पाणी, माती, भाज्या यांचा संपर्क टाळणे, हातमोजे घालणे, लेप्टोस्पायरोसीसचा रुग्ण सापडल्यास त्याची माहिती त्वरीत रुग्णालयात देणे अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
