कोव्हिड केअर सेंटरमध्ये प्रसन्न वातावरण ठेवून रुग्णांना सकारात्मक वागणूक द्यावी : ना. उदय सामंत

0

रत्नागिरी : कोव्हिड केअर सेंटरमध्ये प्रसन्न वातावरण ठेवून कोरोनाच्या रुग्णावर उपचार करताना त्यांना सकारात्मक वागणूक देणे आणि रुग्णालयातील वातावरणात आपण निश्चितपणे ठीक होणार आहोत याची रुग्णास खात्री वाटणे अशा माध्यमातून जिल्ह्यात बरे होणारे रुग्णांचे प्रमाण वाढवावे आणि मृत्युदरावर नियंत्रण आणावे, असे निर्देश ना. उदय सामंत यांनी आज येथे दिले. कोरोनाच्या स्थितीबाबत आढावा श्री. सामंत यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. रुग्ण वाढ होण्याच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाय वेळेत करावेत. तपासणीचे प्रमाण वाढवून निदान लवकर करावे, जेणेकरून उपचार गतिमान पद्धतीने होतील आणि मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात राहील, असेही सामंत म्हणाले. कोव्हिड केअर सेंटरमध्ये प्रसन्न वातावरण ठेवणे आवश्यक आहे. रुग्णास घरी असल्याप्रमाणे सुविधा देण्याची सुरुवात करावी. रुग्णांच्या मनोरंजनासाठी टीव्हीची व्यवस्था करणे, रुग्णांना गाणी ऐकण्यासाठी हेडफोनसारख्या सुविधा देणे असे उपाय योजावेत. त्यामुळे रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहील. करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गृह विलगीकरणात अनेक रुग्ण आहेत, तर काही रुग्ण उपचारासाठी इतर जिल्ह्यांत गेले आहेत. त्यापैकी किती रुग्ण बरे झाले, याचा एकदा आढावा तातडीने घेण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. ज्यांना कोव्हिड नाही अशांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोव्हिड रुग्णाच्या मृत्यूनंतरच्या पद्धतीने केले जातात. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. अशा मृत्यूनंतर अँटीजेन चाचणी करून त्याची कोव्हिडबाबत खात्री करा आणि तशा रुग्णास कोव्हिड नसल्यास त्याच्या नातेवाईकांना त्याची माहिती पारदर्शकपणे द्या, असे निर्देशही सामंत यांनी बैठकीत दिले. बैठकीला अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर, डॉ. अशोक बोल्डे, नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, सभापती बाबू म्हाप आदींसह इतर अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:54 PM 10-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here