चिपळूण : गोडबोले गेटमध्ये तांत्रिक बिघाड; लाखो लिटर पाणी वाया

0

चिपळून : निशाण तलावावरील गोडबोले गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने साचलेले पाणी वाहून वाया जात आहे. अशाप्रकारे पाणी वाया जात असल्याने तलावाच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. याबाबत नगरपरिषदेने लवकरात लवकर   उपाययोजना न केल्यास फेब्रुवारी-मार्चपासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेंगुर्ले शहराला पाणीपुरवठा करणारा कॅम्प-वडखोल निशाण तलाव हा समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंच डोंगरावर असलेला नैसर्गिक तलाव आहे. नारायण तलावाची दुरावस्था असल्याने वेंगुर्ले शहराच्या पाणीपुरवठ्याची संपूर्ण भिस्त या एकट्या निशाण तलावावर आहे. शहरातील सुमारे 1200 पेक्षा जास्त नळ कनेक्शन धारकांना या तलावातून पाणीपुरवठा केला जातो. ऑगस्टच्या सुरुवातीपासून मुसळधार पावसाचे प्रमाण जसजसे कमी होत जाते तसतसे तलावातील उपलब्ध पाणीसाठा टिकून राहावा यासाठी दरवर्षी 15 ऑगस्ट दिवशी नगर परिषदकडून दरवाजा (गोडबोले गेट) बंद करतात. परंतु नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार यंदा 2 ऑगस्ट रोजी गेट बंद करण्यात आले होते. मात्र, 5 ऑगस्टपासून चालू असलेल्या 4 ते 5 दिवसाच्या मुसळधार पावसाने सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली. त्याबरोबर या तलावातील पाणी साठ्यात वाढ होऊन ते दरवाजावरुन ओव्हरफ्लो झाले. नगरपरिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार या दरवाजाची रचना तलावात पाणी पातळी वाढते तेव्हा दरवाजा ओव्हरफ्लो होतोच शिवाय पाण्याचा दाब वाढल्याने खालूनही एक ते दोन इंच दरवाजा उघडला जातो. जेव्हा पाण्याची पातळी धरणात समांतर होते, तेव्हा आपोआप खालून उघडलेला दरवाजा बंद होतो. वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे तलावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशी दरवाजाची रचना करण्यात आलेली आहे. मात्र 7 ऑगस्ट रोजी पडलेल्या पावसाने तलावातील पाण्याची पातळी वाढून हा दरवाजा उघडला गेला. हा उघडलेला दरवाजा पाण्याची पातळी समांतर झाल्यानंतरही तसेच पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतरही आपोआप बंद न झाल्याने कर्मचार्‍यांनी यंत्राद्वारे ते बंद करण्याचा प्रयत्न केला असता बंद करण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक बिघाड झाल्याने तो पूर्णपणे बंद झाला नाही. परिणामी गेल्या पंधरा दिवसापासून तलावातील  लाखो लिटर पाणी वाया गेले. सतत पाणी वाया जात असूनही नगरपरिषदेमार्फत यावर अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. ऑगस्टच्या तिसर्‍या आठवड्यापासून पावसाचे प्रमाण घटले आहे. नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याने उपलब्ध पाणी साठ्यात वाढ होण्याची शक्यता नाही. त्यामुळे  तलावातील पाणी टिकवून ठेवणे गरजेचे आहे. मात्र लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने उपलब्ध पाणी पातळी दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. सदर गेट दुरुस्त करण्यास जेवढा जास्त कालावधी जाईल, तेवढी पाणी साठ्यात घट वाढत जाणार आहे. त्यामुळे एप्रिल-मे ऐवजी फेब्रुवारी मार्चपासून नळकनेक्शन धारकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मे महिन्यात या गेटची देखभाल-दुरुस्ती ऑईलींग करणे गरजेचे असते. मात्र, नगरपरिषदेकडून या गेटच्या संदर्भात कोणतीही उपाययोजना केली जात नाही व तलाव भरल्यानंतर ते करणे शक्य नसते. मे महिन्यातच जर गेटची तपासणी-डागडुजी केली असती, तर सदर लाखो लिटर पाणी वाया गेले नसते. त्यामुळेच  दरवाजा बंद करताना त्यातील नटबोल्ट तुटल्याने दरवाजा व्यवस्थित बंद झाला नाही. परिणामी लाखो लिटर पाणी वाया जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here