चिपळूण : राष्ट्रवादीचे माजी मंत्री व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच्या वृत्ताने जिल्ह्यासह कोकणात खळबळ उडाली आहे. या वृत्ताचा आ. जाधव यांनी इन्कार केला असला तरी या भेटीचे गूढ अद्याप कायम आहे. त्यामुळे ‘पिक्चर अभी बाकी है’ अशा प्रतिक्रिया राजकीय गोटातून उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रवादी सैरभैर झाली असून काही पदाधिकार्यांची खलबते सुरू झाली आहेत. रविवारी सायंकाळी आ. जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. या नंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. याआधी भाजपमध्ये विविध राजकीय नेत्यांचे इनकमिंग सुरू होते. मात्र, आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने देखील इनकमिंग सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री व कोकणातील नेते खा. नारायण राणे यांनी भाजपमध्ये स्वाभिमान पक्ष विलीन करण्याचा प्रस्ताव भाजपला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला हिरवा कंदील दाखविला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आ. भास्कर जाधव यांना शिवबंधनात बांधेल अशी चर्चा रंगू लागली आहे. रत्नागिरी जिल्हा सेनेचा बालेकिल्ला मानला जातो. यामुळे सेनेकडून अशी खेळी खेळली जाऊ शकते अशी चर्चा रंगू लागली आहे. या संदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता आ. जाधव यांचा शिवसेना प्रवेश पक्का असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या संदर्भात खुद्द जाधव यांनी इन्कार केल्याने ठाकरे व जाधव यांच्या भेटीचे गूढ कायम आहे. परंतु शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिकामध्ये ही भेट झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोकणातील राजकारणाला पुन्हाएकदा कलाटणी मिळणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
