रत्नागिरी : आपल्या विविध समस्यांबाबत रत्नागिरीतील काजू उत्पादक आणि प्रक्रियादार यांनी आ. प्रसाद लाड यांची भेट घेतली. यावेळी केरळच्या धर्तीवर काजू बोर्ड आणि कोकणातील काजूला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ. प्रसाद लाड यांनी दिले. कोकणातील काजूला जीआय मानांकन मिळाले तर चांगला दर मिळू शकेल. सिंधुदुर्गतील काजूला मानांकन दिले गेले असले तरीही ते फक्त मर्यादित आहे. संपूर्ण कोकणासाठी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. शेतकर्याला 110 ते 120 रुपये दर मिळाला पाहिजे. त्यातून चांगला व्यावसाय होऊ शकतो. त्याचबरोबर हमीभाव मिळणे गरजेचे आहे. केरळमध्ये काजू बोर्डाच्या माध्यमातून आयात-निर्यात करणे सोपे जात आहे. बोर्डाद्वारे परदेशी काजू बी आयात करणे सोपे होते. त्यातून वर्षभर प्रक्रिया होऊ शकते आणि त्यातून कोकणात तीस ते चाळीस हजार रोजगार निर्मिती करणे शक्य आहे. सध्या या उद्योगातून पंधरा हजार जणांना रोजगार मिळालेला आहे. काजू प्रक्रियादारांचे कर्ज पुनर्गठीत केले गेले तर त्याचा फायदा निश्चितच व्यावसायिकांना होणार आहे. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाकडून सहकार्य मिळावे, अशी मागणी केली गेली होती. रेल्वेस्थानक किंवा एसटी बसस्थानकाजवळ काजूच्या विक्रीसाठीचे सेंटर उभी करण्याची मागणीही उत्पादकांनी केली. या मागण्यांवर लाड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नुसतेच आश्वासन देणार नाही, तर त्याची पूर्तताही केली जाईल. रत्नागिरी किंवा कोकण काजू असा ब्रॅण्ड तयार करण्यासप्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काजू उत्पादकांतर्फे जयवंत विचारे, धनंजय जाधव, प्रताप पवार, विवेक बरगिर, गोविंद चाळके, संदीप टिळेकर, मकरंद नागवेकर, गुरुप्रसाद, विराज घोसाळकर यांच्यासह अन्य बागायतदार होते. काजू व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्रयाबरोबर बैठक लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आ. लाड म्हणाले.
