जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सेना पदाधिकारी संघर्ष विकोपाला

0

रत्नागिरी : जिल्हा परिषदेमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींवरून मुख्य कार्यकारी अधिकारी विरुद्ध पदाधिकारी व सदस्य असा ‘संघर्ष’ पाहायला मिळत आहे. त्यांच्या विरोधात ‘अविश्‍वास ठराव’ आणण्यासाठी सध्या हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. अविश्‍वास ठराव की, बदली हे मुंबईत ठरणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. ग्रामविकास राज्यमंत्री व आमदार, पदाधिकारी यांच्या बैठकीत होणार असल्याचे वृत्त आहे. जिल्हा परिषदेमध्ये गेल्या काही सभांमध्ये अधिकारी विरुद्ध पदाधिकारी असा वाद रंगताना पाहायला मिळत आहे. विशेष करून मुख्य कार्यकारी अधिकारी व पदाधिकारी यांच्यात वारंवार खटके उडताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत तर हा संघर्ष उघडपणे दिसून आला. पदाधिकारी व सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्यावर अविश्‍वास ठराव टाकण्याची भाषा केली आहे. जिल्हा परिषद ग्रामीण भागाच्या विकासाचे केंद्र असल्याने ग्रामस्थांचा संपर्क वारंवार येतो. गोयल या जनसंपर्कासाठी कमी पडत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पदाधिकारी व सदस्यांच्या म्हणण्यानुसार गोयल यांनी मनमानी कारभार असाच सुरू ठेवला तर जिल्ह्याच्या विकासासाठी मारक ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या विकास रथाची अधिकारी व पदाधिकारी ही दोन चाके आहे. यातील एक चाक जरी चालले नाही तर विकासाचा हा रथ पुढे जाणारच नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर यावर सध्या गंभीर विषय सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कारभारावर चोहोबाजूने तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. त्यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. यामध्ये  शिवसेनेचे काही पदाधिकारी अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. सध्या शिवसेनेचे 39, राष्ट्रवादी 15 व काँग्रेस 1 असे 55 सदस्य आहेत. अविश्‍वासाबाबत राष्ट्रवादीची भूमिका अजूनही संभ्रमावस्थेत आहे. सभागृहात याबाबत थेट राष्ट्रवादीने भूमिका जाहीर केलेली नाही. अविश्‍वास ठरावाला नकारही दिलेला नाही. अविश्‍वास ठरावासाठी तसे पाहिले तर शिवसेनेला राष्ट्रवादीची गरज भासणार नाही. शिवसेनेने जर अविश्‍वास ठराव टाकण्याचे अंमलात आणले तर कोणाचीही मदत न घेता ते आणू शकतात. या अविश्‍वास ठरावासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व सदस्य मुंबई वारी करणार असल्याचे समजते. यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार आहेत. यामध्ये सेनेचे जिल्ह्यातील आमदारही सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. ही बैठक मंगळवारी होणार होती. परंतु, काही कारणामुळे रद्द झाली असून, गणेशोत्सव झाल्यानंतर ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत अविश्‍वास ठराव की बदली याबाबत चर्चा होणार आहे. एकंदरीत सेनेच्या पदाधिकार्‍यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरोधात ठाम भूमिका घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here