कणकवली : गणेशोत्सवाला कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी जाणार आहेत. या चाकरमानी गणेशभक्तांचा प्रवास जास्तीत जास्त सुखकर व्हावा या उद्देशाने महामार्गाची स्थिती सुधारावी, ज्या ठिकाणी क्राँक्रीटीकरणाचे काम झालेले नाही अशा ठिकाणी व डायव्हर्शनवर कार्पेट टाकावे, अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मुंबईतील बैठकीत केली. यावर ना. पाटील यांनी सिंधुदुर्गात आवश्यक त्या ठिकाणी कार्पेट टाकण्याचे आदेश महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांना दिले. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनासाठी बैठक झाली. या बैठकीला शिक्षणमंत्री आशिष शेलार, ना. विनोद तावडे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, आ. वैभव नाईक, सा. बां. चे मुख्य अभियंता श्री. गायकवाड, सेक्रेटरी श्री. जोशी, महामार्ग अधिक्षक अभियंता विनय देशपांडे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. वैभव नाईक यांनी मुंबई-गोवा महामार्गासह राज्य आणि ग्रामीण मार्गांच्या दुरावस्थेकडेही ना. पाटील यांचे लक्ष वेधले. अनेक मार्गांची कामे टेंडर प्रक्रियेत आहेत, अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने हे मार्ग धोकादायक झाले आहेत. त्यामुळे चतुर्थीपूर्वी त्यांची तातडीने दुरूस्ती करावी, या मार्गांवरही कार्पेट टाकण्यात यावेत, अशी मागणी केली. यावेळी ना. पाटील यांनी तीही मागणी मान्य करत तशा सूचना अधिकार्यांना दिल्या. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोली घाटाचे रखडलेले काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. तसेच कोकणातील जनतेसाठी टोलमाफी करण्याची मागणी केली.
