कलम ३७० वर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाचसदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी

0

नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणी दाखल झालेल्या सर्व याचिकांवर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाचसदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि जम्मू- काश्मीर प्रशासनाला नोटीस जारी केली आहे. ”आम्ही हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठासमोर पाठवित आहोत”, असे न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि एस. ए. नजीर यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. कोर्टाने जे काही सांगितले आहे ते संयुक्त राष्टसंघाकडे पाठविले आहे, असे ॲटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी कोर्टापुढे सांगितले. जम्मू- काश्मीरमधून कलम ३७० हटविणे, नेत्यांना ताब्यात घेणे आदींबाबत सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर कोर्टाने निर्णय दिला आहे. दुसऱ्या एका आदेशात कोर्टाने म्हटले आहे की, सीपीआय (एम)चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना जम्मू- काश्मीरला जाऊन ताब्यात घेतलेले पक्षाचे नेते मोहम्मद युसूफ तारिगामी यांची भेट घेण्यासाठी परवानगी द्यायला हवी. जर एखाद्या नागरिकाला देशाच्या भागात जायचे असेल तर त्याला प्रवेश द्यायला हवा, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे. तारिगमी यांना ५ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सीताराम येचुरी यांना काश्मीरला जायचे आहे. याबाबत त्यांनी याचिका दाखल केली होती.


 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here