मिऱ्या-नागपूर महामार्गातील बांधकाम मुल्यांकन संशयात

0

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरणातील बांधकामांचे नव्याने मूल्यांकन होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १ ला नोटीस देऊन नाणीजपर्यंतचे सर्व मुल्यांकन झालेले प्रस्ताव तातडीने मागवले आहेत. बाधित बांधकामांचे मूल्यांकन अवाजवी दराने झाले आहे का? असा संशय आहे. त्याचबरोबर रूंदीकरण नियंत्रण रेषेबाहेरची बांधकामेही बाधित क्षेत्रात घेतली गेली असल्याची कुणकूण लागल्याने शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे. मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात बाधित ठरणाऱ्या बांधकामांचे मूल्यांकन करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाणीजपर्यंतची सुमारे ५८५ मूल्यांकन कामे असून, गेल्या दीड वर्षापासून हे काम सुरू आहे. २९ जुलैपर्यंत त्यातील मूल्यांकनाचे १०९ प्रस्ताव पूर्ण झाले नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस देऊन ताडतीने सर्व प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या असल्याचे उपविभाग क्र.१चे उपविभागीय अभियंता दिलीप साळवी यांनी सांगितले. यातील आतापर्यंत ७२ प्रस्ताव पूर्ण करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. मूल्यांकनाचे काम सुरू झाल्यानंतर उपविभाग क्र.१ मध्ये बांधकाम बाधितांची रेलचेल वाढली होती. अनेकजण जाणून-बुजून कमी दराने मूल्यांकन झाल्याचे सांगून संताप व्यक्त करीत होते. कालांतराने मात्र यासंदर्भातील चर्चा अर्थलाभपूर्ण सफल झाल्यानंतर ही वादावादी काहीशी कमी झाली. त्याचबरोबर ज्यांची बांधकामे रूंदीकरण नियंत्रण रेषेबाहेर होती ती मंडळी समाधानाने या उपविभागातून परतत होती. मात्र प्रत्यक्षात हे समाधान तात्पुरते असल्याचे स्पष्ट होऊन फसण्याची जाणीव झाल्यानंतर वेगळीच ओरड होऊ लागली. याची कुणकूण जिल्हा प्रशासानालाही लागली असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंतच्या झालेल्या घडामोडींवरून अवाजवी दराने मुल्यांकन झाले असल्याचा संशय बळावू लागला आहे. त्यात भर म्हणून काही बाधित नसलेले बांधकामधारक आंधळ्या विश्वासाने तोट्यात आल्याने मल्यांकनातील बोगसपणाची ओरड तीव्र आहे. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपये वाचावेत यासाठी या कार्यवाहीतील सत्यता तपासण्यासाठी नाणीजपर्यंत फेरमुल्यांकन करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मुल्यांकन प्रस्ताव नोटीस देऊन मागितल्याने या तर्काला दुजोरा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here