“लाइफ” बना दुंगा सांगत “इन्शुरन्स” कंपनी च्या एजंटने केली विमा धारकाची फसवणूक…

0

रत्नागिरी : विमा एजंटच्या भूलथापांना बळी पडत अनेकजण आपला विमा उतरवतात आणि पैसे मिळताना पश्चातापाला सामोरे जावे लागते. विमा कंपन्या आणि एजंटकडून चुकीची पॉलिसी माथी मारल्याने अनेकांचे नुकसान होते. रत्नागिरीतील नागरिक अजय प्रसादे यांच्या बाबतीत घडलेली एक धक्कादायक घटना पुढे आली असून या फसवणुकीबाबत अजय प्रसादे यांनी पोलिसात धाव घेतली आहे.

◼️ नामांकित कंपनीची घेतली विमा पॉलिसी
अजय प्रसादे हे रत्नागिरी शहरात एक पिग्मी एजंट म्हणून अनेक वर्षे कार्यरत आहेत. भविष्याची सुरक्षित तरतूद म्हणून त्यांना एका विमा एजंट व त्या नामांकित कंपनीच्या डेव्हलपमेंट ऑफिसरने एक विमा पॉलिसी विकत दिली. दरवर्षी ९५०० रुपये भरा आणि ११ वर्षानंतर तुम्हाला २ लाख रुपये मिळतील असे सांगितल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवत प्रसादे यांनी हि पॉलिसी विकत घेतली. या नामंकित कंपनीवर विश्वास ठेवत प्रसादे यांनी आपल्या पिग्मी व्यवसायातून मिळणाऱ्या मानधनातून विम्याचे हप्ते नियमित भरत आपल्या भविष्याची तरतूद करण्यास सुरुवात केली.

◼️ फायदा सोडाच पण भरलेली रक्कम देखील निम्मी झाली
अकरा वर्षानंतर मॅच्युरिटीची रक्कम आणावयास गेलेल्या अजय प्रसादे यांना धक्काच बसला. आजवर प्रसादे यांनी विमा हप्त्याच्या स्वरूपात तब्बल १ लाख ५ हजार रुपये भरले होते. मात्र मॅच्युरिटी नंतर आता तुम्हाला फक्त ५५ हजार मिळतील असे विमा कंपनीकडून सांगण्यात आले. दोन लाख रुपये मिळणार या अपेक्षेने गेलेल्या अजय प्रसादे यांचा पुरता भ्रमनिरास झाला.

◼️ एजंट आणि फिल्ड ऑफिसरने लावला चुना
‘लाईफ बना दुंगा’ असे सांगत पॉलिसी विकणाऱ्यांनी अजय प्रसादे यांना चक्क चुना लावला होता. भरलेल्या एकूण रकमेत वाढ सोडा तर निम्मीच रक्कम मिळत होती. पॉलिसी बाबत चुकीची माहिती देऊन एजंट आणि डेव्हलपमेंट ऑफिसरने आपली फसवणूक झाल्याचे प्रसादे यांना कळताच त्यांनी पोलिसात धाव घेतली.

◼️ पोलिसात धाव
अजय प्रसादे यांनी याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्याकडे तक्रार केली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. एजंट आणि डेव्हलपमेंट ऑफिसरच्या भूलथापांना बळी पडून भविष्यात आणखी कोणी बळी पडू नये म्हणून मी कायदेशीर लढाई लढणार असल्याचे त्यांनी खबरदार शी बोलताना सांगितले.

◼️ लाखाचे झाले बारा हजार
सर्वसामान्य माणूस भविष्याची तरतूद म्हणून इन्शुरन्स एजंट वर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि तो सांगेल ती पोलिसी काढतो. पण लाखाचे बारा हजार जर होणार असतील तर अशा एजंट वर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ही लोकांमधून होत आहे. आता नक्की विश्वास कोणावर ठेवावा हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. आपण काढलेल्या इन्शुरन्स पॉलिसी नक्की योग्य आहेत की नाही हे तपासण्याची वेळ विमा धारकांवर आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:44 PM 15/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here