रत्नागिरी : देहली विश्वविद्यालयात काही विद्यार्थी संघटनांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देशद्रोही ठरवून त्यांच्या पुतळ्याला काळे फासले. याचा विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्यावतीने रत्नागिरीत राणी लक्ष्मी चौक, स्वा. सावरकर यांच्या पुतळ्यासमोर, गाडीतळ, रत्नागिरी येथे जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हिंदुराष्ट्र सेनेचे रत्नागिरी अध्यक्ष सागर कदम, श्रीनाथ सावंत, अतुल कळ्ये, चंद्रकांत राऊळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरीचे अध्यक्ष राकेश नलावडे, देवेंद्र झापडेकर, नंदकुमार साळवी, प्रदीप साळवी, विजय सावंत, ब्राह्मण जागृती सेवा संघाचे प्रणव सरपोतदार, रत्नागिरी ग्राहक पंचायतचे संस्थापक सदस्य जयंत आठल्ये, अशोक घाटे, सनातन संस्थेचे चंद्रशेखर गुडेकर, सौ. शुभांगी मुळ्ये, प्रभाकर सुपल, हिंदु जनजागृती समितीचे पुरुषोत्तम वागळे, प्रमोद भडकमकर, मिलिंद मोरे, संजय जोशी आदी उपस्थित होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देहली विद्यापीठात स्वा. सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हुतात्मा भगतसिंग या त्रय मूर्तीचे एकत्रित पुतळे बसवले होते. काँग्रेसच्या ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या कृत्याला कम्युनिस्टांच्या’ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली. या दोन्ही संघटनांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी हिंद राष्ट्र सेनेचे रत्नागिरी अध्यक्ष सागर कदम यांनी केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकर कुटुंबाने सर्वस्वाचा त्याग केला. अशा महान क्रांतिकारकाला देशद्रोही ठरवणे निंदनीय आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे देवेंद्र झापडेकर म्हणाले.
