महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेच्यावतीने उपोषणाला बसण्याचा इशारा

0

दापोली : महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेच्यावतीने दि. ३१ ऑगस्टपासून दापोली एस.टी. आगारासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. या बाबत महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेचे प्रादेशिक सचिव प्रमोद नलावडे यांनी दापोली आगार व्यवस्थापकांना पत्र दिले आहे. या निवेदनानुसार, दापोली आगारातील कामगारांवर सातत्याने अन्याय होत आहे. अनेकवेळा चर्चा करुनही हा प्रश्न निकालात काढण्यात आलेला नाही. येथील कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. यामध्ये चालक, वाहकांना विश्रामगृहाच्या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी मिळत नाही, पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या जात नाहीत, याची आगारप्रमुखांकडे नोंद नाही. विश्रांतीगृहाची साफसफाई केली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतागृहांची देखभाल, दुरुस्ती तसेच साफसफाई करण्यात येत नाही. दापोली आगारातील ९० टक्के गाड्या नादुरूस्त आहेत. यामध्ये अनेक गाड्या गळक्या आहेत. त्यांना खिडक्या नाहीत, आसने नाहीत. पुढील टायर रिमोल्डचे वापरल्याने अपघात होण्याचा धोका आहे. शिवशाही गाड्यांची स्वच्छता नसते. त्यामुळे प्रवासी वाहकाशी वाद घालतात. जे चालक शिवशाही गाडीच्या ट्रेनिंगसाठी प्रशासनाने पाठविले होते त्यांना ग्रामीण भागात पाठविण्यात येते. कारण त्यांना शिवशाही गाडी चालविण्याबाबत ट्रेनिंग दिले नसल्याने अपघाताच धोका आहे. नवीन कामगारांना आठवडा सुट्टी न देता महिन्याचे तीस दिवस भरावे लागत आहेत. आठवड्यातून एक सुट्टी देणे बंधनकारक असल्यामुळे सुट्टी न देता त्याचा भत्ताही दिला जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. कर्मचाऱ्यांच्या गाड्या पार्किंगची शेड नादुरूस्त झाली आहे. लेखा शाखेच्या व तिकीट विभागाच्या बाहेरील परिसर गलिच्छ आहे. त्या ठिकाणी खिडक्या बंद करुन बसावे लागते. त्यामुळे या भागाची साफसफाई होणे गरजेचे आहे. याबाबत दापोलीआगाराकडे वेळोवेळी तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. याआधी दिलेल्या निवेदनानंतर सर्व तक्रारी सोडविण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु २६ ऑगस्टपर्यंत यातील एकही प्रश्न सुटलेला नाही. यामुळे ३१ ऑगस्ट रोजी आगारातील कामगार उपोषण करणार आहेत, असा इशारा नलावडे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here