रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील तब्बल २०१ सशंयित आरोपी अद्याप फरार असून गेली २० वर्ष हे संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. ‘बीस साल बाद’ उलटूनही आरोपींचा शोध अद्याप सुरुच आहे. काही आरोपीतर गुन्ह्यांमध्ये अटक झाल्यानंतर जामिनावर सुटून फरार झाले आहेत, या संशयितांची संख्या ४५ आहे. हे सुमारे पंधरा ते वीस वर्षातील आरोपी असून त्यामध्ये परराज्यातील आरोपींची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक संशयीत आरोपींनी जिल्ह्यातून बाहेर पळ काढला आहे. सुमारे २० वर्षात तब्बल २०१ आरोपी विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे आहेत. मात्र यातील अनेक आरोपी उत्तरप्रदेश, बिहार या राज्यातील असल्याने त्यांना पकडणे अवघड झाले आहे. रत्नागिरीत कामानिमित्त आल्यानंतर त्यांच्यावर विविध कारणाने गुन्हा दाखल झाला व त्यानंतर येथून त्यांनी पळ काढला. रत्नागिरीत पुन्हा न फिरकल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई झालेली नाही. गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांमधील गुन्हयातील फरारी, व जामीनावर सुटून पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र तरीही आरोपी पोलिसांना गुंगारा देत आहेत. फरारी, गुन्ह्यात हवे असलेल्या आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहिम राबविली आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. आता वीस वर्षानंतर तरी कितपत यश येते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
