रत्नागिरी : जिल्हयात ग्रामसेवकांचे विविध मागण्यांसाठी ९ ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरूच होते. पण आता २२ ऑगस्टपासून काम बंद आंदोलनाचे हत्यार उगारल्याने जिल्हयातील ८४६ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे. जिल्ह्यात ६५० ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी झाल्याने गाव कारभारच पूर्णपणे थांबला आहे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद नेमून वेतन त्रुटी दूर कराव्यात, समान काम समान वेतन लागू करणे, ग्रामसेवक संवर्गात शासन निर्णयाप्रमाणे सुधारित प्रवासभत्ता प्रति महा लागू करणे, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता पदवीधर करणे, सन २००५ नंतरचे ग्रामसेवक यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, आदर्श ग्रामसेवक वेतनवाढ देणे, एक ग्रामपंचायत एक ग्रामसेवक नेमणूक, ग्रामसेवक संवर्गातील अन्य यंत्रणांची कामे कमी करणे आदी मागण्यांसाठी संघटनेतर्फे ९ ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. जिल्ह्यातील हे आंदोलन सुरू आहे. ९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आंदोलनाचा परिणाम ग्रामपंचायतीच्या कारभारावर दिसून येत होता. या आंदोलनाकडे शासनाने लक्ष न दिल्याने अखेर २२ ऑगस्टपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय ग्रामसेवक संघटनेने घेतला. हे आंदोलन सध्या जिल्हयात तीव्रपणे सुरू आहे. जिल्हयातील ६५० ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे सर्वच ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे. या आंदोलनाचा फटका विकासकामांना तसेच ग्रामस्थांनाही बसला आहे. विधानसभेची आचारसंहिता जवळ येत असल्याने गावातील विकासकामांचे प्रस्ताव पाठवण्याचे काम सध्या सुरू होते. आता ग्रामसेवकच नसल्याने प्रस्ताव तसेच पडून राहिले आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारचे दाखलेही मिळत नसल्याने ग्रामस्थांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
