रत्नागिरी : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या १०३ प्राथमिक शाळांना नवीन वर्गखोली मंजूर झाली आहे. यासाठी ७ कोटी ६० लाख रूपयांची तरतूद केली जाणार आहे. यामुळे मोडकळीस आलेल्या शाळांना आधार मिळाला आहे. जिल्ह्यात प्राथमिक शाळांच्या इमारतींची अवस्था बिकट बनली आहे. यावर्षी तर अतिवृष्टीमुळे ११७ प्राथमिक शाळांना फटका बसला होता. या शाळांचे एकूण २ कोटी ३८ लाख रूपयांचे नुकसान झाले होते. राज्यात शिक्षण विभागाकडून पूरबाधित शाळांना ५७ कोटी रूपयांचे तरतूद केली आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केली होती. यातील रत्नागिरीतील पूरबाधित शाळांना निधी मिळणार आहे. हा निधी थेट शाळेच्या खात्यात जमा होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. हा निधी मिळेल तेव्हा मिळेल परंतु, जिल्हा वार्षिक नियोजन मात्र जिल्हयातील १०३ प्राथमिक शाळांना मदतीचा हात मिळाला आहे. या शाळांना नवीन वर्गखोली बांधता येणार आहे. सन २०१९-२० या वर्षासाठी ७ कोटी ६० लाख रूपये मंजूर झाले आहेत. यामुळे आता १०३ वर्गखोल्या नवीन होणार आहेत. प्रत्येक वर्गखोलीसाठी साधारण ७ लाख ३८ हजार रूपयांची तरतूद असणार आहे. सर्वाधिक वर्गखोल्या चिपळूण व संगमेश्वर तालुक्याला मंजूर झाल्या आहेत. जिल्हयात अनेक ठिकाणी प्राथमिकशाळांच्या इमारतींची अवस्था बिकट बनली होती. आता मात्र ७ कोटी रूपयांचा निधी मिळाल्याने या शाळांना दिलासा मिळाला आहे.
