जिल्ह्यातील 313 शाळा बंद होणार ?

0

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या 0 ते 5 पटाच्या 313 शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरु आहेत; मात्र सव्वाशे गावातील शाळांना पर्यायी व्यवस्था नाही. जंगल, नद्या पार करुन दुसर्‍या शाळांची मानसिकता नसल्याने शेकडो मुलांच्या शिक्षणात खंड पडू शकतो. काही व्यवस्थापन समित्यांनी शाळा बंद करु नये असे ठरावही शिक्षण विभागाकडे पाठवले आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीत 0 ते 5 पटाच्या 313 शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव आवश्यक आहे. गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी शाळा बंदचे महत्त्व पटवून द्यावयाचे आहे. ही प्रक्रिया येत्या पंधरा दिवसात पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश गटशिक्षणधिकारी यांना दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. शासनाकडून आलेल्या आदेशानुसार शाळा बंद करावयाच्या असून त्यातील मुलांना 3 किलोमीटरच्या आत असलेल्या शाळेत समायोजित करावयाचे आहे; परंतु जिल्ह्यातील सुमारे 125 शाळा या दुर्गम व अतिदुर्गम भागात आहेत. तेथील मुलांना पर्यायी शाळेसाठी जंगल, निर्जन रस्ते किंवा नदी पार करुन जावे लागु शकते. ग्रामीण भाग असल्यामुळे त्या शाळा बंद केल्यास नाईलाजास्तव मुलांच्या शिक्षणावर गदा येऊ शकते. दुर्गम भागातील मुले 6 ते 10 वयोगटातील आहेत. दुसरी शाळा एक किलोमीटरच्या परिसरात नाही. सार्वजनिक वाहतुकीचेही साधन नाही. खाजगी वाहतूक सुविधा दिली तरीही पालकांना त्या मुलांसोबत दोन्ही वेळेस जावे लागेल. त्यात पालकांच्या वेळेचा अपव्यय होईल. शेती आणि मोलमजुरी करणार्‍या या पालकांची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने त्या मुलांचे शिक्षण बंद पडू शकते. अशाप्रकारचे ठराव काही शाळा व्यवस्थापन समित्यांनी शिक्षण विभागाला सादर करत वस्तुस्थिती मांडली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:37 PM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here