तक्रार दाखल झाल्याच्या दिवशीही चिदंबरम यांनी केला होता हवाला व्यवहार

0

नवी दिल्ली : पी. चिदंबरम यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली त्यादिवशीदेखील त्यांनी हवाला व्यवहार केला होता, असा आरोप अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला. चिदंबरम हे अत्यंत हुशार असल्याने हवाला प्रकरणाचा बारकाईने तपास केला जात असल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. दरम्यान, न्यायालयाने गुरुवारपर्यंत चिदंबरम यांना अटकेपासून दिलासा दिला आहे. आयएनएक्स मीडीया घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप झालेले चिदंबरम सध्या सीबीआय कोठडीत आहेत. ज्यादिवशी चिदंबरम यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यादिवशी देखील त्यांनी हवाला व्यवहार केला होता, असा सनसनाटी आरोप ईडीकडून न्यायालयासमोर करण्यात आला. हवाला व्यवहार करण्यासाठी प्रचंड प्रमाणावर प्लॅनिंग करावे लागते. थोडक्यात अतिशय हुशार लोकांशी आम्ही सामना करीत आहोत. मुर्ख लोक हवाला व्यवहार करीत नाहीत, अशी टिप्पणी तुषार मेहता यांनी युक्‍तीवादावेळी केली. याला प्रतिवाद करताना चिदंबरम यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी जाणीवपूर्वकपणे चिदंबरम यांना सार्‍या प्रकरणात गोवले जात असून त्यांचा केवळ आणि केवळ अपमान करण्याचे उद्दिष्ट असल्याचा दावा केला. हवाला व्यवहाराच्या जाळ्याचे इतके थर चिदंबरम यांनी तयार केले आहेत की, त्याचा तपास लावणे ईडीसारख्या संस्थेला कठीण जात असल्याचे मेहता यांनी नमूद केले. जोपर्यंत आरोपपत्र दाखल केले जात नाही, तोवर चिदंबरम यांना तपासाचा अहवाल दिला जाऊ शकत नाही, असे मेहता यांनी सांगितले. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here