रत्नागिरी : कुटुंबापासून ताटातूट झालेला आणि भरकटत औरंगाबादमधून थेट रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचलेल्या दिव्यांग तरुणाची गाठभेट सोशल मीडियामुळे अखेर त्याच्या कुटुंबियांशी झाली आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सकारात्मक वापर कसा होऊ शकतो, याचं हे उदाहारण ठरलं आहे. फेसबुकवरील पोस्ट वाचून औरंगाबादमधून हरवलेल्या आणि रस्तोरस्ती भरकटत असलेल्या सुमित वेलदोडे याला बुधवारी त्याच्या कुटुंबातील सदस्य दिसताच ही भेट घडवून आणणार्या आरवली येथील धर्मेंद्र कोंडविलकर आणि सहकार्यांचे डोळे पाणावले.औरंगाबादमधील सिद्धार्थनगर राहणारा सुमित मधुकर वेलदोडे (25) हा 17 ऑगस्टपासून घरातून बेपत्ता झाला होता. त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं असल्याने भरकटत भरकटत तो संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे पोहचला. सुरुवातील इतर वेड्यांप्रमाणेच हा एक असल्याचे वाटून कुणी त्याची चौकशी केली नाही. मात्र, आरवली येथे मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गालगत चहाची टपरी चालवणारा स्थानिक तरुण धमेंद्र कोंडविलकर या स्थमानिक तरुणाने त्याच्याकडे हिंदीत चौकशी केली. यावेळी मीही मराठी असल्याचे त्याने सांगितले. रस्त्यालगत असलेली दुकाने, हॉटेलमध्ये कुणी काही देईल, ते खाऊन हा तरुण रस्त्याकडेलाच कुठे जागा मिळेल, तिथे झोपत असे. त्याच्याकडून जी काही अर्धवट माहिती मिळाली त्याआधारे हा तरुण औरंगाबादधील असल्याचे समजल्याने धमेर्र्र्ंद्र कोंडविलकर यांनी फेसबुकवर सोमवारी एक पोस्ट टाकली. कुटुंबापासून दुरावलेल्या या तरुणाला त्याचं घर मिळावं, यासाठी मग कोंडविकर यांचे मित्र अजिंक्य खैर, काही पत्रकार मित्र तसेच त्यांचे रत्नागिरी येथील मित्र सचिन देसाई यांनीही या संदर्भातील पोस्ट त्यांच्या औरंगाबादमधील मित्रांना टॅग केली. त्यातूनच या तरूणाचा पत्ता मिळण्यास मदत झाली. दरम्यान, फेसबुकवरील पोस्ट वाचून सुमितला शोधत असलेल्या नातेवाईकांपैकी मेहुणे तसेच बहिणीने धर्मेद्र कोंडविलकर यांच्याशी तातडीने संपर्क साधून सुमितवर लक्ष ठेवण्याची विनंती केली. त्याआधी तो हरवल्याची फिर्यादही पोलिसात देण्यात आली होती. फेसबुकमुळे ठावठिकाणा लागेल्या सुमिला नेण्यासाठी औरंगाबादहून वेलदोडे कुटुंबीय आरवली येथे बुधवारी सायंकाळी दाखल झाले. त्यांनी कोंडविलकर यांच्याकडून सुमितला सुखरुप ताब्यात घेतल्यावर कृतज्ञता व्यक्त केली. सोशल मीडियाचा चांगला उपयोग कसा होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण असून या उदाहरणातून अनेकांपुढे आदर्श उभा राहिला आहे.
