निकृष्ट कामाबाबत दोषी अधिकार्‍यांवर कारवाई होणार; ना. वायकर

0

खेड : जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या निकृष्ट कामाबाबत दोषी अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही  पालकमंत्री ना. रवींद्र वायकर यांनी दिली. येत्या महिनाभरात या पुलावरून अवजड वाहनांचीही वाहतूक सुरू केली जाईल, असा विश्वास देखील ना. वायकर यांनी यावेळी व्यक्त केला.
भरणे येथील जगबुडी नदी वरील नवीन पुलाची मंगळवारी ना. वायकर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम, जिल्हाप्रमुख सचिन कदम, जि. प. सदस्य चंद्रकांत कदम, पंचायत समिती सभापती अपर्णा नक्षे, उपसभापती सुनील आंब्रे, तहसीलदार शिवाजी जाधव, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पुलाची पाहणी करताना ना. वायकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. या पुलासाठी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमध्ये केवळ सातच लोखंडी शिगा कशा काय वापरल्या या प्रश्नावर उत्तर देताना अधिकारी चांगलेच गडबडले. येत्या पंधरा दिवसात आवश्यक ती सर्व उपाययोजना तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक कामे पूर्ण करून हा पूल अवजड वाहनांना वाहतुकीसाठी खुला करावा अशा सूचना ना. वायकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. त्यामुळे येत्या महिनाभरात  या पुलावरून अवजड वाहतूक नियमित  सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलावरून अधिकार्‍यांना घेऊन गाडी चालवली म्हणजे या पुलाचा शुभारंभ झाला असे होत नाही. या पुलाचे श्रेय घेणे हे महत्वाचे नसून कोकणातील जनतेची होणारी गैरसोय दूर होणे महत्वाचे आहे. त्यामुळे श्रेयवाद नको, अशी उपरोधिक टीकाही ना. वायकर यांनी यावेळी कोणाचेही नाव न घेता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here