जळगावकरांनो आमचे साहेब तुमच्याकडे येतायत…

0

✍️ हेमंत वणजु
संपादक : रत्नागिरी खबरदार

➡ सुमारे दोन वर्षांपूर्वी डॉ. प्रवीण मुंढे साहेबांची रत्नागिरीत बदली झाली आणि पुण्यातील त्यांच्या पोलीस दलातील टीमचा निरोप देतानाचा व्हिडीओ समोर आला. त्याचवेळी जाणीव झाली कि पोलीस दलातील एक अतुलनीय व्यक्तिमत्व रत्नागिरीत येतंय. पहिल्याच पत्रकार परिषदेत साहेबांच्या विद्वत्तेची झलक मिळाली. अधिकारी कितीही चांगला असला, लोकप्रिय असला तरी होणारी बदली मात्र चुकत नाही. जनतेच्या हृदयासून ते सोशल मिडीयाच्या डीपी पर्यंत स्थान मिळवणारा अधिकारी अनेक वर्षांनी आम्हाला पहावयास मिळालाय. विद्वान, तरुण, धाडसी, कर्तव्यदक्ष आणि सदैव हसतमुख हि विशेषणे साहेबांना अगदी चपलख शोभतात. प्रचंड जनशक्तीचा सुयोग्य वापर करून साहेबांनी आपल्या रत्नागिरीतील कारकिर्दीत उल्लेखनीय काम केलंय. सामाजिक संघटनांची मोट बांधून कठीण प्रसंगात हजारो कुटुंबाना आधार दिलाय. आपलं कार्यक्षेत्र सोडाच पण त्यापलीकडे देखील आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून समाजासाठी उठावदार काम केलंय. या माणसाची धेय्य, धोरण नेहमी सुस्पष्ट असायची त्यामुळे पत्रकार परिषदेत कधी माहिती देताना गोंधळ झाला नाही. माणसं जोडण्याचे कसब साहेबांच्या अंगी आहे. रत्नागिरी मॅरेथॉन या भव्यदिव्य उपक्रमाची सुरुवात साहेबांच्या कल्पनेतून आणि मेहनतीतून झाली जी रत्नागिरीकर कधीच विसरणार नाहीत. खेड मधील संवेदनशील प्रकरण असो किंवा एखाद्या मोठ्या गुन्ह्याचा तपास असो साहेबांची निर्णयक्षमता प्रत्येकवेळी प्रभावी ठरली. रुबादार आणि कणखर व्यक्तिमत्व असणारा हा संवेदनशील माणूस अनेक कठीण प्रसंगात देखील तितक्याच ताकदीने उभं राहिलेला आम्ही पाहिलाय. साहेबांची विद्वत्ता, व्यासंग आणि कर्तबगारी यामुळेच आज ते रत्नागिरीकरांच्या हृदयात जाऊन बसलेत. मिडासच्या स्पर्शाने दगडाचे सोने होते असे म्हणातात. साहेबांची कारकीर्द ज्या ज्या विषयाला स्पर्श करून गेली तिथे तिथे नवा रंग जमवून गेली. साहेबांच्या जनताभिमुख कारकिर्दीचे हे रंग आम्हा रत्नागिरीकरांच्या कायम स्मरणात राहतील. मुंढे साहेबांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जळगावकरांनो आमचे साहेब तुमच्याकडे येतायत…

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
04:49 PM 19/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here