सावंतवाडी : सावंतवाडी येथे होणार्य राज्य सुरक्षा रक्षक मंडळाच्या प्रशिक्षण केंद्रातून 10 हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. या मंडळासाठी शासनाने जाहीर केलेल्या 25 कोटी रुपयांच्या निधीपैकी 13 कोटी रुपयांचा निधी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्याशी चर्चा करुन उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यानंतर येत्या महिनाभरात या केंद्रातून सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. सावंतवाडी येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे राज्यातील पहिले सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्र साकारत आहे. या केंद्राचा भूमिपूजन सोहळा ना. दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. खा. विनायक राऊत, आ. नीतेश राणे, राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम, डीआयजी जे. आय. जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधिक्षक जी. के. शिवतरे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सा. बां. चे कार्यकारी अभियंता युवराज देसाई, उपनगराध्यक्षा सौ.अन्नपूर्णा कोरगावकर, वेंगुर्ले उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता राऊळ, सभापती पंकज पेडणेकर, महामंडळाचे नोडल अधिकारी आत्माराम राणे, संजू परब, सुधीर आडिवेकर आदी उपस्थित होते. ना. केसरकर म्हणाले, सिंधुदुर्गच्या प्रगतीत सुरक्षा रक्षक महामंडळाचे हे केेंद्र सावंतवाडी शहरात महत्वाचा टप्पा ठरेल. सावंतवाडी हे पूर्वी संस्थान होते. त्यावेळी संस्थानाचे पोलिस हेडकॉर्टर याठिकाणी अस्तित्वात होते. पोलिसांसाठी वसाहती, कॉलनीही त्या काळात उभारण्यात आल्या होता. मात्र, काळानुरुप बदल होऊन पोलिस वसाहती व हेडकॉर्टर सिंधुदुर्गनगरीत हलविण्यात आल्या. सावंतवाडीचे हे गतवैभव परत आणण्यासाठी सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या पायाभूत सुविधांसाठी 2 कोटी 21 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत शेजारील आयटीआयची जुनी इमारत तंत्रशिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा करुन प्रशिक्षण केंद्राला तात्पुरती वापरावयास देण्यासाठी विनंती केली आहे. त्यांनी याबाबत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. या जुन्या इमारतींसाठी 80 लाख रुपयांचा खर्च डागडुजीकरिता केला जाणार आहे. महामंडळाकडे स्वतःचा कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र, मोठमोठ्या कॉर्पोरेशन कंपन्यांची येणी वेळेत मिळत नसल्यामुळे त्यांनी शासनाची मदत मागितली आहे. मंडळाच्या उर्वरीत 13 कोटी रुपयांसाठी वित्तमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनीही प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत असे ना.केसरकर म्हणाले. सुरक्षा मंडळाला रेल्वेस्थानकाशेजारी वसतिगृहासाठी तर नवी मुंबई येथे मुख्यालयासाठी जागा हवी आहे. त्याबाबत लवकरच पाठपुरावा केला जाणार आहे. सेवानिवृत्त पोलिसांना हक्काची घरे मिळावीत यासाठी महाराष्ट्रात लवकरच उपक्रम राबविला जाणार आहे. सावंतवाडी व ओरोस येथे पोलिसांना मालकीची घरे उपलब्ध करुन दिली जातील. पोलीस स्टेशन तेथे वसतिगृह ही संकल्पना प्रस्तावित आहे. महाराष्ट्रात क्राईम डिटेक्शन रेट सर्वात जास्त असल्यामुळे राज्य सुरक्षा रक्षक मंडळाने 10 हजार युवकांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. सिधुदुर्ग पोलिस कल्याण निधीतून 2 पेट्रोल पंपासाठी प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तर बांदा व कुडाळ किल्ल्यांमध्ये असलेल्या दोन नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. तेथील किल्ले पर्यटनासाठी वापरण्यात येणार आहेत, असे केसरकर यांनी सांगितले. खा. विनायक राऊत म्हणाले, राज्याचे माजी गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून राज्य सुरक्षा मंडळाची निर्मिती झाली आहे. अतिरेकी कारवाया वाढल्या. त्यामुळेच राज्य सुरक्षा कायदा करावा लागला. त्यानंतर महामंडळ अस्तित्वात आले. मंडळामार्फत नियुक्त केलेल्या रक्षकांना आर्थिक स्थैर्यता, नोकरीत अधिकार प्राप्त होतात. महाराष्ट्रातील हे पहिले सुरक्षा केंद्र आणून केसरकर यांनी गृहमंत्रीपद सार्थकी लावलं. या मंडळासाठी लागणारा आवश्यक निधी खासदार फंडातून उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. आ. नीतेश राणे म्हणाले, महामंडळाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. मात्र त्याची हवी तशी प्रचार प्रसिद्धी झालेली नाही. या मंडळातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. कंपन्या, मोठमोठ्या संस्था यांना दर्जेदार सुरक्षा रक्षक पोहोचविण्याचे काम या मंडळामार्फत होईल. पोलीस महासंचालक कनकरत्नम यांनी सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्राची रुपरेषा जाहीर केली. जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम यांनी पोलिस व मंडळाचे सुरक्षा रक्षक एकत्र येऊन काम करतील व पोलिस दलाला अधिकाधिक सक्षम करण्यासाठी आपले कर्तव्य बजावतील, असे आश्वासन दिले.
